… अन् राहात्याच्या उपनगराध्यक्षांनी धरले मुख्याधिकार्‍यांचे पाय! दुकानांची वेळ जाहीर करण्याची पालिकेसह जिल्हा प्रशासनाकडे मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
शहरात व्यवसाय किती वेळेपर्यंत सुरू राहणार, याबाबत दुसर्‍या दिवशीही गोंधळाचे वातावरण दिसून आले. मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी वेळ मर्यादेबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी दुकाने बंद करण्याची वेळ जाहीर करा, अशी मागणी करत थेट मुख्याधिकार्‍यांचे पाय धरले. उपनगराध्यक्षांचा हा पवित्रा बघत मुख्याधिकार्‍यांनी तत्काळ 8 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचे आदेश असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी अनलॉकची नियमावली जाहीर केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात कोविड नियमांचे पालन करून पूर्ण वेळ दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना राहाता नगरपालिका प्रशासनाचा असमन्वय व्यावसायिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहे. मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी वेळ मर्यादे संदर्भात अधिसूचना जारी करण्याची गरज असताना त्या जारी केल्या तर नाहीच उलट पालिका कर्मचार्‍यांनी दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा तोंडी फतवा काढल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मंगळवारी (ता.8) दुसर्‍या दिवशीही व्यावसायिकांनी आपली दुकाने 4 वाजता बंद केली. काही व्यावसायिकांनी याबाबत उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांना लक्ष घालण्याची मागणी केली.

व्यावसायिकांमधील संभ्रम दूर व्हावा यासाठी पठारे यांनी मुख्याधिकार्‍यांना वेळ मर्यादेसंदर्भात अधिसूचना जारी करण्याची मागणी केली. मात्र मुख्याधिकारी वेळेसंदर्भात उडवाउडवी करत असल्याने पठारे यांनी त्यांच्या दुचाकीला अडवत वेळ मर्यादा स्पष्ट करा, व्यावसायिकांचा संभ्रम दूर करा, अशी वारंवार विचारणा करुनही मुख्याधिकारी उत्तर देत नव्हते. उपनराध्यक्षांनी शेवटी पाया पडतो पण वेळ सांगा असा पवित्रा घेतला. मुख्याधिकार्‍यांनी अखेर काही दुकाने सायंकाळी 8 वाजेपर्यंत तर काही दुकाने 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले.


व्यवसाय किती वाजेपर्यंत सुरू ठेवावेत याचा निर्णय मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण जाहीर करत नाही. कार्यालयीन अधीक्षक नवनाथ जगताप हे परस्पर अनेक निर्णय घेत आहेत. तोंडी फतवा जाहीर करून नगरपालिका प्रशासन जनतेला वेठीस धरत आहे. रुग्णांची संख्या कमी झाली असताना चुकीचे निर्णय का घेतले जातात, असा सवाल उपस्थित करत उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी पालिकेचा मनमानी कारभार थांबवावा, अशी मागणी केली आहे.

Visits: 174 Today: 1 Total: 1953660

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *