तीन-चार महिन्यांत ‘त्या’ औषधांचे भारतात उत्पादन ः डॉ. गंगाखेडकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील सहकार्यांनी केला सत्कार
नायक वृत्तसेवा, शिर्डी
चीनमध्ये सध्या सुरू असलेली कोविडची लाट ते कशा पध्दतीने आटोक्यात आणतात हे पाहावे लागेल. मोठी लोकसंख्या असल्याने या लाटेतून बदललेला नवा कोविड विषाणू येऊ शकतो. अर्थात तो कसा असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. तथापि एका अमेरिकन कंपनीचे पॅक्सलोव्हीड व नीरमाट्रेलव्हीर हे औषध कोविड बाधेची लक्षणे दिसताच पाच दिवसांच्या आत घेतले तर रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, हे सिध्द झालेय. पुढील तीन-चार महिन्यांत या औषधाचे भारतात उत्पादन सुरू होईल, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.
कोविड प्रकोपात देशपातळीवर महत्वाची भूमिका बजावणारे डॉ. गंगाखेडकर हे अंबेजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ शासकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी. एड्सबाबत त्यांनी केलेले संशोधन व राबविलेल्या मोहिमांबद्दल त्यांना दोन वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. याबद्दल अंबोजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील सहकार्यांनी येथे एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला. त्यांचे येथील वर्गमित्र डॉ. एम. वाय. देशमुख तसेच डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. पी. जी. गुंजाळ, डॉ. प्रकाश कांकरीया, डॉ. अमर देशमुख, डॉ. सई बोरावके-देशमुख व उद्योजक किशोर बोरावके यावेळी उपस्थित होते.
अंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात 1975 सालची पहिली तुकडी. डॉ. रमण गंगाखेडकर हे आमचे वर्गमित्र, दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. एक बुध्दीमान विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात. कोविड प्रकोपात आणि त्यापूर्वी एड्सचा फैलाव होऊ लागला. त्यावेळी देशातील जनमानसाला शास्त्रशुध्द पध्दतीने धीर देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या सत्कारासाठी राज्यभरातील त्यांचे वर्गमित्र नुकतेच शिर्डीत एकत्र जमले, असल्याची माहिती डॉ. एम. वाय. देशमुख, यांनी दिली.