ओसरत्या संक्रमणाने संगमनेरसह जिल्ह्याची सरासरीही ढासळली! आज संगमनेर शहरातील अवघ्या पाच जणांसह अठ्ठावन्न जणांना कोविडची लागण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेले दोन महिने चढत्या कोविड संक्रमणाने आभाळाला टेकलेली संगमनेरसह जिल्ह्याची सरासरी रुग्णगती एकदमच ढासळल्याचे दिलासादायक चित्रही आता समोर आले असून जिल्ह्याभोवती बसलेला कोविडच्या दुसर्या लाटेचा फास आता सैल झाला आहे. मागील आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातून सरासरी 866 रुग्ण या गतीने 6 हजार 928 तर संगमनेर तालुक्यातून सरासरी 84 रुग्ण या गतीने 672 रुग्ण समोर आले आहे. मे महिन्यात उच्चांकी पातळी गाठणारी रुग्णगती ढासळल्याने संगमनेरसह संपूर्ण जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आजही सलग पाचव्या दिवशी जिल्ह्याची रुग्णसंख्या निचांकी नोंदविली गेली असून शहरातील अवघ्या पाच जणांसह संगमनेर तालुक्यातून अवघे 58 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 215 झाली आहे.

मार्च-एप्रिल-मे या तीन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवणार्या कोविड संक्रमणाला जूनमध्ये मात्र मोठा ब्रेक लागला असून गेल्या मोठ्या कालावधीपासून चिंताजनक बनलेली जिल्ह्याची कोविड स्थिती अवघ्या आठ दिवसांतच पूर्णतः नियंत्रणात आली आहे. फेब्रुवारीतील धुमधडाक्यातील सोहळ्यांनी बोलावणे धाडलेल्या कोविडने मार्चमध्ये त्याचे परिणाम समोर आणण्यास सुरुवात केली आणि मार्चच्या 31 दिवसांत 604 रुग्ण दररोज या गतीने जिल्ह्यात 18 हजार 730 तर संगमनेर तालुक्यात सरासरी 55 रुग्ण या गतीने 1 हजार 693 रुग्णांची भर घातली. एप्रिलमध्येही संक्रमणाच्या गतीमध्ये मोठी वाढ होवून संगमनेर तालुक्यातील संक्रमणाचा वेग अक्षरशः उसळी घेत दैनिक 215 रुग्ण या गतीवर पोहोचून महिन्याभरात तालुक्यातून 6 हजार 445 तर जिल्ह्याची रुग्णगतीही चौपट गतीने वाढून सरासरी 2 हजार 671 रुग्ण दररोज या वेगाने जिल्ह्यातून 80 हजार 134 रुग्ण समोर आले.

मे मध्ये संक्रमणाचा वेग खालावेल असा जाणकारांचा अंदाज असतांना तो फोल ठरवितांना कोविडने मे महिन्याच्या 31 दिवसांत जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यातील कोविडचे उच्चांक मोडीत काढले. या 31 दिवसांत जिल्ह्यात दररोज सरासरी 2 हजार 810 रुग्णांची भर पडून महिन्या अखेर एकूण रुग्णसंख्येत तब्बल 87 हजार 95 रुग्णांची वाढ झाली, तर संगमनेर तालुक्याची सरासरी गतीही 215 वरुन थेट 279 रुग्णांवर जावून एकट्या संगमनेर तालुक्यातून उच्चांकी 8 हजार 655 रुग्ण समोर आले. त्याचा परिणाम दुसर्या लाटेतील कोविड संक्रमणाला मे महिना अधिक पोषक ठरुन जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थितीच बिघडण्यात झाला. एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या कोविड संक्रमणात वाढ होण्यासोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे समोर आले.

एप्रिलच्या 30 दिवसांत दररोज 26 या प्रमाणे जिल्ह्यातील 775, मे महिन्यात दररोज 40 या प्रमाणे महिन्याभरात एकूण 1 हजार 225 आणि चालू महिन्यातील पहिल्या सात दिवसांतच दररोज सरासरी 42 मृत्यू या प्रमाणे आत्तापर्यंत 295 जणांचा बळी गेला आहे. याचाच अर्थ कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेत मे महिना सर्वाधीक संक्रमणाचा ठरला, तर जूनच्या पहिल्या दिवसापासूनच जिल्ह्यातील एकूण रुग्णगतीला मोठा ब्रेक लागून रुग्णसंख्येला ओहोटी लागली, मात्र एकीकडे रुग्णसंख्या ओसरत असतांना दुसरीकडे कोविड संक्रमणातून बाधित होवून मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या गेल्या तीन महिन्यांपेक्षा जूनच्या पहिल्या सात दिवसांतच अधिक असल्याचे भयानक वास्तवही समोर आले. अर्थात मे महिन्यातच संक्रमित होवून अद्यापही उपचाराधीन असलेल्या रुग्णांचील मृतांमध्ये अधिक संख्या असल्याने चालू महिन्यात संक्रमण होवून मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे.

मागील आठ दिवसांपासून उतरावर असलेल्या जिल्ह्याच्या रुग्णगतीने आजही आपली उतरती सरासरी कायम राखली. आज शासकीय प्रयोगशाळेचे अवघे 9, खासगी प्रयोगशाळेचे 18 आणि रॅपीड अँटीजेनचे 31 अशा एकूण 58 अहवालांमधून संगमनेर तालुक्यातील रुग्ण समोर आले. त्यात शहरातील मालदाड रोडवरील 22 वर्षीय तरुणी, मेहेर मळा परिसरातील 15 वर्षीय मुलगी आणि संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 42 व 24 वर्षीय महिलेसह 31 वर्षीय महिला अशा एकूण अवघ्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ग्रामीणभागातील पिंपळे येथील 42 वर्षीय तरुण, पिंपळगाव कोंझिरा येथील 50 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, आश्वी बु. येथील 48 वर्षीय इसम, आश्वी खुर्द येथील 55 वर्षीय इसम,

उंबरी बाळापूर येथील 48 वर्षीय महिला, शिबलापूर येथील 18 वर्षीय तरुण, कोल्हेवाडीतील 81 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 70 वर्षीय महिला व 42 वर्षीय तरुण, चिकणीतील 41 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 25 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 73, 62, 40 व 35 वर्षीय महिला, 40, 35 व 23 वर्षीय तरुण व 19 वर्षीय तरुणी, प्रतापपूर येथील 45 वर्षीय इसमासह 38 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 47 वर्षीय इसमासह 36 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर येथील 29 वर्षीय तरुण, राजापूर येथील 48 वर्षीय महिला, अकलापूर येथील 43 वर्षीय तरुण, माळेगाव हवेलीतील 50 वर्षीय इसम, ओझर खुर्दमधील 24 वर्षीय तरुण, चिखलीतील 60 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 58 व 53 वर्षीय इसम,

हिवरगाव पावसा येथील 41 व 35 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 55 वर्षीय इसम, साकूर येथील 45 वर्षीय इसमासह 42 वर्षीय तरुण, 35 व 34 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगा व 16 वर्षीय मुलगी, सावरचोळ येथील 54 वर्षीय इसम, कौठे कमळेश्वर येथील 87 वर्षीय महिला, बांबलेवाडीतील 79 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 52 वर्षीय इसम व 21 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 57, 65 व 38 वर्षीय महिलांसह 13 वर्षीय मुलगा आणि जाखुरीतील सात वर्षीय मुलीला कोविडचे संक्रमण झाले आहे. आज समोर आलेले तालुक्यातील रुग्ण 28 गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये विभागलेले आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 22 हजार 215 झाली आहे.

जिल्ह्यात आज सलग दुसर्या दिवशी रुग्णसंख्या सहाशेच्या खाली राहीली. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून आज 60 पेक्षा अधिक रुग्ण आढळले नाहीत हे आजच्या अहवालातील आणखी एक विशेष. आज जिल्ह्यात सर्वाधीक 58 रुग्ण संगमनेर तालुक्यातून तर 57 रुग्ण नेवासा आणि 55 रुग्ण शेवगाव तालुक्यातून समोर आले. त्याशिवाय पाथर्डी 46, पारनेर 45, कर्जत 37, श्रीगोंदा 36, नगर ग्रामीण 29, अकोले व राहुरी प्रत्येकी 28, श्रीरामपूर 26, कोपरगाव 24, अहमदनगर महापालिका क्षेत्र 22, राहाता 20, जामखेड 16 व अन्य जिल्ह्यातील सात जणांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची आजवरची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 69 हजार 63 झाली आहे.

