विविध समस्यांकडे ‘माकप’ने प्रशासनाचे वेधले लक्ष अकोले तहसीलदारांसह तालुका आरोग्य अधिकार्‍यांना दिले निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व श्रमिकांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) व अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शुक्रवारी (ता.26) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत तालुक्यातील विधवा, परित्यक्ता, अपंग व निराधारांचे शासकीय मानधन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. निराधारांचे यामुळे अतोनात हाल होत आहेत. प्रशासनाने तातडीने याबाबत कारवाई करून निराधारांचे मानधन त्यांच्या खात्यावर वर्ग करावे, हाताच्या बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे आधार कार्ड अपडेट नाहीत या सबबीखाली तालुक्यातील 180 निराधारांचे शासकीय मानधन बंद करण्यात आले आहे. योग्य तो मार्ग काढून तातडीने या निराधारांचे मानधन पुन्हा सुरू करावे, वीजबिल न भरल्याचे कारण देत शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ही मोहीम तातडीने थांबवून शेतकर्‍यांचे वीजबिल माफ करावे. बांधकाम कामगारांचे नोंदणी नूतनीकरण अयोग्य कारणे देत रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी व सर्व बांधकाम कामगारांचे नूतनीकरण करून घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा. सर्व आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी आशा कर्मचार्‍यांसाठी मुक्कामाची व विश्रांतीची सोय करावी, बोगस रेशनकार्ड तपासणीच्या मोहिमेची मुदत वाढवून द्यावी व सर्व पात्र रेशनधारकांचे अर्ज शासकीय यंत्रणेमार्फत भरून घेत सर्व पात्र रेशनधारकांचे रेशन पूर्ववत सुरू राहील यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. या मागण्यांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सीटूच्यावतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

सदरील प्रश्नांवर योग्य ती कारवाई केली जाईल व प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले जातील असे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी शिष्टमंडळाला दिले. निराधार योजनेचे नायब तहसीलदार यांनाही विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांचीही भेट घेतली. तालुक्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबतचा आग्रह यावेळी डॉ.गंभीरे यांच्याकडे शिष्टमंडळाच्यावतीने धरण्यात आला. तसेच आशा कर्मचारी व अर्धवेळ परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शिष्टमंडळाने प्रशासनास दिला आहे. सदर निवेदन देतेवेळी डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, अ‍ॅड.ज्ञानेश्वर काकड, जुबेदा मणियार, आराधना बोर्‍हाडे, राजाराम गंभीरे, भीमा मुठे, देवराम उघडे, साहेबराव घोडे, भाऊसाहेब मेंगाळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *