राजूरमध्ये सहकार्याकडून महिला पोलिसाचा विनयभंग जिल्हा पोलीस मुख्यालयात तक्रार केल्यानंतर हवालदाराविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राजूर
रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना पोलीस हवालदाराने आपल्या सहकारी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यात घडली आहे. याप्रकरणी हवालदार भाऊसाहेब आघाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रात्रीच्या वेळी कामावर असलेल्या महिला पोलीस कर्मचार्यावर मैत्री करण्यासाठी दबाव आणून विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

याबाबत पीडित महिला पोलीस कर्मचार्याने जिल्हा पोलीस कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर आघाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री कामावर असताना या महिला पोलीस कर्मचार्यावर त्यांचे सहकारी असलेला आरोपी भाऊसाहेब आघाव याने माझ्याशी मैत्री कर, असे म्हणत त्यांचा विनयभंग केला. या घटनेनंतर लगेच महिला पोलिसाने वरीष्ठांकडे तक्रार केली.

या तक्रारीनंतर आरोपी आघाव याने महिलेची लेखी माफी मागितली. यापुढे असे करणार नाही, असे सांगून महिलेने बदलीची मागणी करून काही काळ प्रकरण थांबले होते. मात्र पुन्हा आरोपीने महिलेची छेडछाड काढली. त्यामुळे महिला पोलिसाने अहमदनगर मुख्यालयात येऊन वरीष्ठांकडे तक्रार केली. आणि आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. त्यानुसार शनिवारी (ता.5) रात्री आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन खैरनार हे करत आहे. यामुळे पोलीस दलात पुन्हा खळबळ उडाली आहे.
