पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या? संगमनेरातील धक्कादायक प्रकार; मामाच्या घरातच घडली घटना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुंबईत वास्तव्यास असलेल्या मात्र गणेशोत्सवासाठी संगमनेरात मामाच्या घरी आलेल्या 35 वर्षीय तरुणाने आपल्या अवघ्या 22 वर्षीय पत्नीला सुरुवातीला बेदम मारहाण केली व नंतर तिला विषारी औषध पाजून फास देत मारले व नंतर स्वतःही औषध प्राशन करुन गळफास लावून घेतला. पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी संगमनेरातील इंदिरानगरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेत दोघांचाही जीव गेला. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. गणेशोत्सवाचे निमित्त करुन आलेल्या कुलदीप अडांगळे याने रविवारी सकाळीच शहरातच राहणार्‍या व गेल्या काही दिवसांपासून माहेरीच असलेल्या आपल्या पत्नीला बोलावून आणले होते. त्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण करीत तिचा खून करुन नंतर आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मयतेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेने संगमनेरात एकच खळबळ उडाली असून ऐन विसर्जनाच्या दिनी साकूर येथील दोन चुलत बहिणींनी गळफास घेतल्याची घटना ताजी असतानाच इंदिरानगरमध्ये घडलेला हा प्रकार समोर आल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (ता.7) दुपारी अडीचच्या आधी शहरातील अतिशय गजबजलेल्या इंदिरानगरमधील जय जवान चौकात घडली. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहणारा कुलदीप सुनील अडांगळे (वय 35) हा गणेशोत्सवाचे निमित्त करुन मुंबईहून एकटाच संगमनेरातील इंदिरानगरमध्ये राहणार्‍या आपल्या मामाच्या घरी आला होता. मयत कुलदीपचे यापूर्वी तीन लग्न झाल्याची चर्चा असून त्याची तिसर्‍या क्रमांकाची पत्नी वैष्णवी संजय खांबेकर (वय 22) ही संगमनेरातील खंडोबा गल्लीतील रहिवाशी होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात पटतं नसल्याने ती सध्या माहेरी आपल्या वडिलांसोबत रहात होती.


रविवारी (ता.7) डोक्यात काहीतरी योजना आखून कुलदीप अडांगळेने आपल्या खंडोबा गल्लीत राहणार्‍या पत्नीच्या घरी जावून तिला नांदण्यासाठी घेवून आला. मात्र तिच्या माहेरावरुन मामाच्या घरात येताच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि त्यांच्यात जोरदार भांडणं सुरु झाले. यावेळी कुलदीपने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचीही चर्चा असून त्यानंतर त्याने बळजबरीने तिला विषारी औषध पाजले व तिचा ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. रागाच्या भरात त्याच्या मनात हैदोस घालणार्‍या सैतानाने मनातील कृती पूर्ण केल्यानंतर कुलदीप भानावर आला आणि आता आपली सुटका नाही या विचाराने त्यानेही राहिलेले विषारी औषध घेवून गळफास घेतला.


हा प्रकार मामाच्या लक्षात येताच दोघांनाही घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारांपूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी वैद्यकिय अधिकार्‍यांच्या माहितीवरुन शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत दोन्ही शव ताब्यात घेतले असून मयत वैष्णवी संजय खांबेकर (वय 22) हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात तर, कुलदीप अडांगळेचा मृतदेह घुलेवाडीच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मयत विवाहितेच्या शवविच्छेदन अहवालानंतर दाखल गुन्ह्याच्या कलमात बदल होणार आहेत. तूर्त या प्रकरणाचा वैद्यकिय अहवाल अप्राप्त असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपासाला सुरुवात केली आहे.


शनिवारी (ता.6) ऐन विसर्जनाच्या दिनी संपूर्ण शहरात उत्साह दाटलेला असताना पठारभागातील साकूरमध्ये मानसी राजेंद्र सागरगिळे (वय 13) व तन्वी अजित सागरगिळे (वय 17) या सख्ख्या चुलत बहिणींनी घराच्या पत्र्याला असलेल्या लोखंडी एँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास बांधून आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असतानाच संगमनेरच्या इंदिरानगरमध्ये 35 वर्षीय पतीने अज्ञात कारणाने आपल्या 22 वर्षीय पत्नीला मारहाण, विषारी औषध आणि गळफास देवून मारल्याने व नंतर स्वतःही आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.


संगमनेरच्या इंदिरानगरमध्ये घडलेल्या घटनेतील संशयीत मयत कुलदीप सुनील अडांगळे हा मुंबईत रहात होता, मात्र गणेशोत्सवासाठी संगमनेरात मामाकडे आला होता. या दरम्यान रविवारी त्याने सध्या त्याच्यापासून अलिप्त राहणार्‍या संगमनेरातील आपल्या तिसर्‍या बायकोच्या माहेरी जावून तिला नांदायला येण्याची गळ घातली. त्याच्यावर विश्‍वास ठेवून ती त्याच्यासोबत आल्यानंतर काहीवेळातच त्यांच्यातील वाद उफाळले आणि त्याची परिणिती दोघांचाही हाकनाक बळी जाण्यात झाली. पठारभागातील दुहेरी आत्महत्येनंतर लागलीच दुसर्‍या दिवशी घडलेल्या या भयानक प्रकाराने संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 111 Today: 1 Total: 1102300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *