पंतप्रधानांशी दहा मिनिटांच्या चर्चेतून दादांनी मार्गी लावले चार प्रकल्प! ‘पुणे-नाशिक’ हायस्पीड रेल्वेमार्ग चर्चेत; दर आठवड्याला आढावा घेण्याचे आश्वासन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकमान्य टिळक यांच्या नावाने दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंगळवारी पुण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अवघ्या दहा मिनिटांच्या चर्चेतून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी चार प्रकल्पांबाबतचा शब्द घेतला आहे. त्यात पुण्यासाठी महत्त्वकांक्षी ठरणार्‍या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासह पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग, रिंगरोड आणि पुणे-बेंगळुरु एसप्रेस महामार्गाचा समावेश आहे. महसूल दिनाच्या कार्यक्रमानंतर खुद्द पवार यांनीच याबाबतची सविस्तर माहिती दिली असून पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी तीनही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना निधी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मध्यंतरी डळमळीत अवस्थेत पोहोचलेल्या तीन जिल्ह्यांमधील या बहुप्रतीक्षीत रेल्वेमार्गाच्या कामाला पुन्हा गती प्राप्त होणार असल्याचे दिसू लागले आहे. या चारही प्रकल्पांबाबत दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना दिले.

पुणे शहराला सततच्या वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी रिंगरोड, पुरंदर येथे प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे ते बेंगळुरु एसप्रेस महामार्ग यासह पुणे व नाशिक या महानगरांना जोडणारा देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वमार्ग उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या प्राधान्यक्रमात आहे. यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपदी असताना पवार यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेताना निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर घडले आणि भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमधून पुणे-नाशिक दहापदरी महामार्गाचा विषय नव्याने समोर आल्याने या बहुप्रतीक्षीत रेल्वेमार्गाचा विषय बासनात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र उपमुख्यमंत्री पवार यांच्या घोषणेतून या मार्गाला पुन्हा एकदा संजीवनी मिळाल्याचे दिसत आहे.

पुण्यातील महसूल दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधार्‍या उपमुख्यमंत्री पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दहा मिनिटांची चर्चा झाल्याचे सांगताना त्यातून पुण्यासाठी प्रस्तावित असलेल्या जवळपास ५० हजार कोटी रुपयांच्या या चारही प्रकल्पांचा विषय त्यांच्यासमोर उपस्थित केल्याचे सांगितले. त्यावर त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगताना त्यांनी पुरंदर विमानतळाबाबत दोन मतप्रवाह असल्याचा उल्लेख करीत समन्वयाने यावर मार्ग काढून पुण्याची गरज ओळखून विमानतळाच्या कामाला गती देणार असल्याचे सांगितले. मागील वर्षभर आपण विरोधी पक्षात असल्याने खोळंबलेल्या प्रकल्पांबाबत फार काही करता आले नाही, मात्र आता दोनशेहून अधिक आमदारांचा पाठिंबा असलेल्या सरकारमध्ये सहभागी असल्याने येणार्‍या काळात हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखवला.

सत्तेत सहभागी झाल्याने वाढलेल्या दिल्ली दौर्‍याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी राज्यातील महत्त्वाच्या पदावर काम करताना केंद्र सरकारच्या संबंधित प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी, ते मार्गी लावण्यासाठी राजधानीत जावे लागते असे उत्तर त्यांनी दिले. सेमी हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबत अधिक भाष्य करताना त्यांनी या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी पुणे, अहमदनगर व नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांना निधी देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे निधीच्या अभावाने थांबलेले भूसंपादनाचे काम आता पुन्हा जोमात सुरु होणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत. पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेणार काय? या प्रश्नावर धडक उत्तर देताना पवार यांनी पुण्याच्या प्रश्नाबाबत बैठक घेण्याचा आपणास उपमुख्यमंत्री म्हणून अधिकार असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याची आढावा बैठक घेवू शकतात. सुदैवाने आपल्याकडे अर्थ खाते आणि निधी वाटपाचे अधिकारही देण्यात आल्याने या सर्व प्रकल्पांना बळ मिळाल्याचे चित्र लवकरच बघायला मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

पुणे आणि नाशिक या दोन महानगरांदरम्यान उभारल्या जाणार्‍या या बहुउद्देशीय रेल्वे प्रकल्पासाठी संगमनेर तालुयातील २६ गावांच्या हद्दीत २९३ हेटर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. याशिवाय वन विभागाची ४६ हेटर आणि राज्य शासनाची १५ हेटर जमिनही भूसंपादित होणार आहे. एकूण २३५ किलोमीटर अंतराच्या या रेल्वेमार्गातील ७० किलोमीटर अंतर नगर जिल्ह्यातील एकट्या संगमनेर तालुयात आहे. त्यासाठी महारेलकडून आत्तापर्यंत १६ गावांमधील १९ हेटर जमिनीचे थेट १०१ खरेदीखतांद्वारे संपादनही करण्यात आले असून त्यासाठी २९ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील २८५.४३ हेटर जमिनीच्या मूल्यांकनाचे काम सुरु असताना त्यातील ४५ हेटरहून अधिक जमिनीचे १२४ खरेदीखतांद्वारे भूसंपादन करण्यात आले असून त्यासाठी ५७ कोटी २७ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. संगमनेर तालुयाच्या वेशीवरील सिन्नर तालुयात मूल्यांकनाची प्रक्रिया गतीमान असतानाच त्याला खीळ बसली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक निधीची अडचण दूर सारल्याने या प्रकल्पाच्या भूसंपादन मूल्यांकनास आणि थेट खरेदी प्रक्रियेस गती मिळणार असल्याने पुणे, नगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यातून आनंद व्यक्त होत आहे.


पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला मंजुरी मिळवून तत्कालीन फडणवीस सरकारने त्याला गती देण्याचे काम केले होते. सदरील रेल्वे प्रकल्प विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रिम प्रोजेट’ असल्याचेही मानले जाते. आता त्यात राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तितकाच रस दाखवल्याने सदरच्या प्रकल्पाला डबल इंजिन लागल्याचे समजले जात आहे. त्यातच पवार यांनी आगामी काळात या प्रकल्पाच्या कामाची गती वाढणार असल्याचे संकेतही दिल्याने काहीकाळ बासनात गेल्याची स्थिती निर्माण झालेल्या या बहुप्रतीक्षीत रेल्वेमार्गाच्या कामाला पुन्हा वेग येणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 79619

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *