डॉक्टरांविषयी बेताल वक्तव्य करणार्या ढूस यांच्यावर कारवाई करा! राहुरीतील निमा संघटनेची मागणी; अन्यथा बेमुदत बंद पाळण्याचा इशारा
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर चालकांवर सोशल मीडियावरून चिखलफेक करून डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण करून बेताल वक्तव्य करणार्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांच्यावर दोन दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई न झाल्यास संघटनेच्यावतीने तालुकाभर निषेधात्मक बेमुदत बंद पाळण्यात येईल. तसेच सर्व खासगी दवाखाने बंद ठेवण्यात येईल, असा इशारा देत निमा संघटनेने जाहीर निषेध केला आहे. याबाबत प्रांतधिकारी डॉ.दयानंद जगताप, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन ढूस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निमा संघटनेच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
देवळाली प्रवरा येथे डॉ.भास्कर सिनारे यांच्या अधिपत्याखाली डॉ.सचिन चौधरी, डॉ.भागवत वीर, डॉ.प्रवीण कोठुळे यांनी ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू केले. परंतु कोविड सेंटरच्या जागी शासकीय कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी करताना आप्पासाहेब ढूस यांनी बेताल वक्तव्य करीत बीएएमएस पदवीधर, पदव्युत्तर एमडी व एमएस डॉक्टर्सविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांचा निषेध करुन निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी निमा संघटनेने केली आहे.
ढूस यांचा वैद्यकीय क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना पदवीधर व पदव्युत्तर डॉक्टरांच्या अधिकाराबद्दल मानहानीकारक व वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे समाजामध्ये वैद्यकीय क्षेत्राविषयी तेढ व वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन डॉक्टरांविषयी गैरसमज निर्माण होतो. अवैद्यकीय व्यक्तीने वैद्यकीय माहिती न घेता वैद्यकीय क्षेत्राविषयी कोणतीही विधाने करू नये. डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण करून बेताल वक्तव्य करणार्या ढूस यांच्यावर दोन दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई न झाल्यास संघटनेच्यावतीने तालुकाभर निषेधात्मक बेमुदत बंद पाळण्यात येईल. तसेच सर्व खासगी दवाखाने बंद ठेवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रसाद ढूस, डॉ.जयंत कुलकर्णी, डॉ.भागवत वीर, डॉ.प्रवीण कोठुळे, डॉ.प्रकाश पवार, डॉ.सचिन चौधरी, डॉ.नरेंद्र इंगळे, डॉ.किशोर पवार, डॉ.मंगेश कुंभकर्ण, डॉ.अनिल तनपुरे, डॉ.किशोर खेडकर, डॉ.अमोल विटनोर, डॉ.किशोर सोनवणे, डॉ.हर्षद चोरडिया, डॉ.रवी घुगरकर, डॉ.किशोर वाघमारे, डॉ.अजय खेडकर, डॉ.भाग्यवान, डॉ.शेकोकर आदी उपस्थित होते.