दुचाकीच्या भीषण अपघातात महिला ठार! निमजजवळील घटना; पतीसह तिघांना गंभीर दुखापत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील निमज शिवारात असलेल्या भोकनळ वस्तीजवळ आज सकाळी साडेआठच्या सुमारास दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 55 वर्षीय महिला जागीच ठार झाली. तर, तिच्या पतीसह अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेद्वारा जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या भीषण अपघातात अहिल्याबाई क्षीरसागर ही जुन्नर तालुक्यातील महिला ठार झाली आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.9) सकाळी साडेआठच्या सुमारास खांडगाव-निमज रस्त्यावरील भोकनळ वस्तीजवळ घडली. या भयानक अपघातात दोन मोटार सायकलची एकमेकांना समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही वाहनांवर बसलेले प्रवाशी रस्त्यावर फेकले गेले. त्यात एका दुचाकीवर बसलेल्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दोन दुचाकींच्या धडकेने मोठा आवाज झाल्याने भोकनळ वस्ती परिसरात राहणार्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारा खासगी रुग्णालयात दाखल केले. तर, अतिशय गंभीर असलेल्या अहिल्याबाई देवीदास क्षीरसागर (वय 55, रा.साकूरी, ता.जुन्नर, जि.पुणे) या महिलेला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलेे. या अपघातात दुचाकी चालविणारे त्यांचे पती देवीदास क्षीरसागर व दुसर्या दुचाकीवरील अन्य दोघे असे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून एखाद्या टेम्पोने हुल मारल्याने सदरचा अपघात घडला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपासही सुरु करण्यात आला आहे. ऐन नवरात्रौत्सवात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा बळी गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हेडकॉन्स्टेबल डी.एस.वायाळ पुढील तपास करीत आहेत.