चितळीमध्ये विध्वंसांच्या खुणा मागे ठेवून कोविडने काढला पळ! गेल्या आठ दिवसांपासून एकही बाधित आढळून न आल्याने ग्रामस्थांत समाधान

नायक वृत्तसेवा, शिर्डी
पाच हजार लोकसंख्येच्या चितळी गावावर दोन महिन्यांपूर्वी कोविडने जीवघेणा हल्ला चढविला. त्यामध्ये एकापाठोपाठ एक पन्नासहून अधिक ग्रामस्थांचे बळी गेले. सरकारी यंत्रणेने ग्रामस्थांना सोबत घेऊन निकराची झुंज दिली. मात्र, जीवितहानी टळली नाही. सरकारी नोंदींनुसार बाधितांची संख्या सहाशेच्यावर गेली होती. घरीच औषधोपचार करून किती बरे झाले, याची तर गणतीच नव्हती. आता गावातील अनेक कुटुंबांत विध्वंसाच्या खुणा मागे ठेवत कोविडने येथून काढता पाय घेतलाय. गेल्या आठ दिवसांपासून येथे एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. यामुळे ग्रामस्थांनी मोकळा श्वास घेतला आहे.


एप्रिल महिन्यामध्ये या गावात कोविडने अक्षरशः उच्छाद घातला होता. दीड महिन्यात 69 मृत्यू झाले. त्यातील 51 कोरोनामुळे झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. एवढी मोठी जीवितहानी अहमदनगर जिल्ह्यात क्वचितच एखाद्या गावात झाली असेल. हे गाव राहाता तालुक्यात, विधानसभा मतदारसंघ कोपरगाव व पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र श्रीरामपूर आहे. यामुळे ग्रामस्थांना एरव्ही देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

कोविडने या गावावर चढविलेला हल्ला एवढा जबरदस्त होता, की त्यामुळे सुरू झालेली मृत्यूची मालिका थांबता थांबेना. पंधरा दिवसांपूर्वी दोन तरुणांचे बळी गेले. त्यानंतर मात्र परिस्थिती सुधारली आहे. सध्या येथील केवळ दोन रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या आठ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही. गावातील प्रत्येकाने कोविडची धास्ती घेतलीय. बाहेरच्या गावांतील लोकांनी येथे येऊन गर्दी करू नये, गावातील प्रत्येकाने मास्क व शारीरिक अंतराचे पालन करावे, असे येथील जाणत्या ग्रामस्थांना वाटते. कोविड कृतीदलाची सदस्य असलेली तरुण मंडळी त्यासाठी जागृती करीत आहे.

साथीच्या काळात चितळी गावात सरकारी आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. घरोघरी जाऊन कोविड चाचण्या केल्या. त्या काळात विलगीकरण कक्ष सुरू केले. आता येथील कोविड संसर्गाचा फैलाव आटोक्यातआला आहे. ग्रामस्थांनी पुरेशी काळजी घ्यायला हवी.

समर्थ शेवाळे (गटविकास अधिकारी, राहाता)

Visits: 3 Today: 1 Total: 27406

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *