पावसापूर्वी साठा करण्यासाठी पठारावर वाळुतस्करांची मोठी लगबग! जांबुतच्या केटीवेअरजवळ जेसीबी यंत्रांचा वापर करुन दिवसाढवळ्या प्रचंड वाळुउपसा सुरु..


नायक वृत्तसेवा, घारगाव
संपूर्ण तालुका कोविडच्या दहशतीखाली वावरत असतांना पठाराभागातील वाळु तस्करांची मात्र भलतीच लगबग सुरु असल्याचे दृष्य सध्या मुळा खोर्‍यातील सर्वच ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यातच पावसाळा तोंडावर असल्याने नदीपात्रातील कोल्हापूर बंधार्‍यांच्या फळ्या काढून पाणी सोडण्यात आले आहे. त्याचा थेट फायदा घेत पठारावरील असंख्य वाळु तस्कर नदीपात्रातच ठाण मांडून बसले असून जेसीबी व पोकलंड यंत्राचा वापर करुन रस्त्याच्या कडेलाच वाळुचे मोठे ढिग रचले जात आहेत. दिवसा ढवळ्या मुळानदीवर शेकडों हातांकडून दरोडा पडत असूनही त्याकडे ना महसूल खात्याचे लक्ष्य आहे, ना घारगाव पोलिसांचे. त्यामुळे या दोन्ही विभागातील अधिकार्‍यांच्या आशीर्वादानेच वाळु चोरीचा धंदा तेजीत असल्याचे अगदी सुस्पष्ट चित्र सध्या पठारभागातील मुळाखोर्‍यात पदोपदी दिसत आहे.


आज सकाळी दैनिक नायकच्या कार्यालयात फोन करुन काही शेतकर्‍यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार पावसाळा तोंडावर असल्याने पठारावरील जांबुत बु. येथील कोल्हापूर टाईप बंधार्‍यांच्या फळ्या काढून पाणी सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या मोठ्या कालावधीपासून पाण्याखाली दबलेली वाळु आता मोकळी होवू लागल्याने पठारावरील वाळु तस्कारांना सुगीचे दिवस आले आहेत. येथील वाहुवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी अनेक वाळु तस्कर नदीपात्रातच ठाण मांडून आहेत. जांबुत येथील नदीपात्रात तर आज भल्या सकाळपासून दोन जेसीबी व पोकलंड यंत्राच्या मदतीने वाळु तस्करांची टोळी राजरोसपणे


दिवसाढवळ्या वाळु उपसा करीत असून थेट नदीपात्रातून उपसलेल्या वाळुचे ढिग नजीकच्या रस्त्याच्या कडेला केले जात आहेत. जांबुत प्रमाणेच पठारावरील खैरदरा व शेळकेवाडीचा परिसरही वाळु तस्करांच्या हालचालींनी व्यापला असून या परिसरातूनही मोठ्या प्रमाणात वाळु उपसा सुरु आहे. संपूर्ण पठारभागाचा विचार करता एकट्या मुळा नदीच्या पात्रातून दररोज शंभर ते सव्वाशे ढंपर वाळु उपसा होत असून त्या बदल्यात शासनाला एका नव्या रुपयाचाही महसूल मिळत नाही. असे असतांनाही महसूल अथवा पोलीस विभागाकडून त्याला कोणताही अटकाव होत नसल्याने या दोन्ही विभागातील अधिकार्‍यांच्या आशीर्वादानेच स्थानिक शेतकर्‍यांना धाक दाखवून वाळु चोरांकडून नदीपात्रावर दरोडे घातले जात असल्याचे भयानक चित्र सध्या पठारावर जागोजागी दिसत आहे.


अकोले तालुक्यातील हरिश्‍चंद्रगडाच्या परिसरातून मुळा नदीचा उगम होतो. अकोले, संगमनेर व पारनेर तालुक्यातून वाहत जावून राहुरीनजीक मुळानगर येथे पोहोचणार्‍या या पाण्यावर धरण बांधण्यात आले आहे. पावसाळ्यात अकोले ते मुळानगर (राहुरी) या अंतराच्या मुळा नदीच्या पात्रात पावसाळ्याचे चारही महिने व त्यानंतर काही कालावधीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. त्यामुळे संपूर्ण पावसाळा व त्यानंतरही काही महिने थेट नदीपात्रातून होणारा वाळु उपसा नैसर्गिक कारणाने थांबवावा लागतो. पठारावरील घारगाव, बोरबन, आभाळवाडी, जांबुत व मांडवे या भागात मुळा नदीवर कोल्हापूर टाईप बंधारे बांधण्यात आले आहेत. पावसाळा सुरु होताच या सर्व केटीवेअरच्या फळ्या काढून बंधार्‍यातील पाणी सोडून देण्याची पद्धत आहे. त्यानुसार शुक्रवारच्या पावसानंतर या सर्व बंधार्‍यांच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत.


मुळा नदीपात्रात जवळपास चार ते पाच महिने पाणी वाहत असल्याने या कालावधीत वाळु चोरांचे धंदे थंडावलेले असतात. त्यावर मात करण्यासाठी आता वाळु तस्करांच्या टोळ्यांनी वेगळीच शक्कल लढविली असून नदीत पाणी येण्यापूर्वीच जेसीबी व पोकलंड यंत्राच्या मदतीने संपूर्ण नदीपात्रात जागोजागी मोठ्या प्रमाणात वाळु उपसली जात असून उपसलेल्या वाळुचे ढिग एखाद्या शेतात अथवा रस्त्याच्या कडेला लावले जात आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत नदीला पाणी आले तरीही पठारावरील वाळु तस्करांचे उद्योग मात्र अव्याहतपणे सुरुच राहतील. नदीला पाणी येवून गेल्यानंतर तस्करांनी केलेल्या भल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पुन्हा नवीन वाळुची आवक होवून त्यानंतर परत जोमाने वाळुवर दरोडे घातले जातील. हे दृष्य अनेकांसाठी वेदनादायी ठरत असले तरीही वाळुच्या दरोडेखोरांची पठारावर मोठी दहशत असल्याने व त्यांना राजकीय आशीर्वादासह काही अधिकार्‍यांचेही पाठबळ असल्याने दिवसाढवळ्या वाळु उपसा होत असूनही सबकुछ ‘अलबेल’ असल्याचे भयानक चित्र बघायला मिळत आहे.


पठारभागातील एका वाळु तस्कराला राजकीय व्यक्तिच्या जवळच्या इसमाचा थेट आशीर्वाद असल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामुळे त्याच्याविषयी चकार शब्द काढायलाही कोणी धजावत नाहीत. त्याचा फायदा घेत या महाभागाने घारगावपासून मांडव्यापर्यंत आपली हुकूमत स्थापन केली असून या परिसरातून वाहणार्‍या नदीवर त्याची अलिखित मालकी असल्यासारखे भयानक वास्तव समोर येत आहे. त्याच्या दहशतीपुढे ना महसूल अधिकारी धजावतात, ना घारगावचे पोलीस. त्यामुळे सध्या पठारभागात जागोजागी मुळेचे लचके तोडले जात असूनही या दोन्ही विभागातील अधिकार्‍यांनी आपले डोळे बंद करुन धेतले आहेत.

Visits: 81 Today: 1 Total: 1105568

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *