वाघोलीकर हॉस्पिटलमध्ये मूत्रविकारांतील तीन किचकट शस्त्रक्रिया यशस्वी! संगमनेरातील समृद्ध वैद्यकीय सेवेच्या शिरपेचात पुन्हा खोचला मानाचा तुरा
महेश पगारे, संगमनेर
कोविडच्या भयावह संकटात आरोग्य विभाग देवदूताचीच भूमिका निभावत आहे. यामध्ये माणुसकी ओशाळल्याच्या दोन-तीन घटना वगळता संगमनेरच्या वैद्यकीय सेवेने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात लौकिक प्राप्त केला आहे. अत्याधुनिक सेवा-सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कामगिरीच्या बळावर शेजारील तालुके आणि जिल्ह्यातील रुग्ण उपचारांसाठी संगमनेरात दाखल होतात. यामध्येच मूत्रविकारांच्या समस्यांनी त्रस्त असणार्या रुग्णांना नामांकित मूत्रविकार शल्यविशारद डॉ.हृषीकेश वाघोलीकर यांनी विविध समस्या असणार्या तीन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन नवा इतिहास रचला आहे. याबद्दल वैद्यकीय वर्तुळासह नागरिकांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेरची समृद्ध बाजारपेठ म्हणून ओळख आहे. यामध्ये कापड, शेती, वाहने, बांधकाम आणि मुख्य वैद्यकीय सेवेची समृद्ध परंपरा आहे. विविध समस्यांवरील नामांकित तज्ज्ञांची उपलब्धता असल्याने रुग्ण सरळ संगमनेरची वाट धरतात. त्याचाच प्रत्यय नुकताच आला आहे. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील गेल्या नऊ-दहा वर्षांपासून लघवीचा त्रास असणारा 55 वर्षीय रुग्ण उपचारांसाठी वाघोलीकर हॉस्पिटलमध्ये आला. येथे डॉ.हृषीकेश वाघोलीकर यांनी तपासण्या केल्या असता त्यांना तब्बल पाच सेंटीमीटरचा मोठा मुतखडा मूत्राशयात असल्याचे निदान झाले. एवढ्या मोठ्या मुतखड्यासाठी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. अखेर दीड तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे हा मुतखडा काढण्यात आला. यानंतर रुग्णाच्या वेदना शमल्यानंतर दुसर्याच दिवशी हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली.
याप्रमाणेच राहुरी येथील 66 वर्षीय वृद्ध महिला समस्या घेऊन आली. तिच्या डाव्या मूत्रपिंडामध्ये मोठा संसर्ग झालेला होता. प्राथमिक उपचार करून झाल्यानंतर सोनोग्राफी तपासणी केली असता 7 सेंटीमीटरची पाण्याची गाठ आढळून आली. या गाठीमुळे मूत्रपिंडाची नळी दाबली जात होती. डॉ.वाघोलीकर यांनी तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ही पाण्याची गाठ मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांच्या खूप जवळ असल्याने इजा न होता काढणे ही खूप गुंतागुंतीची बाब होती. एरव्ही मूत्रपिंडाची कोणतीही शस्त्रक्रिया असेल तर त्याला कमीत कमी 15 ते 20 टाके येतात. परंतु, वृद्धेची ही किचकट शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या सहाय्याने प्रथमच संगमनेरात करण्यात आली आहे. अवघ्या तीन टाक्यांत शस्त्रक्रिया करुन दोन दिवसांत पूर्णपणे बरे करून घरी सोडण्यात आले.
तसेच राहाता तालुक्यातील लोणी येथील 35 वर्षीय तरुण पाच दिवसांपासून लिंगाला सूज आल्याची तक्रार घेऊन आला होता. डॉ.वाघोलीकर यांनी आपुलकीने विचारपूस करत व तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की रुग्णाला पेनिस फ्रॅक्चर झालेले आहे. हा अतिशय दुर्मिळ आजार असून (दोन लाखांत एखादा), अशा रुग्णांची तातडीने शस्त्रक्रिया गरजेचे असते. परंतु, रुग्ण पाच दिवसानंतर आल्याने ही शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होती. तरी देखील डॉ.वाघोलीकर यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन लिंग पूर्ववत कार्यरत केले. तीनही किचकट शस्त्रक्रिया करुन मूत्रविकार रुग्णांसाठी डॉ.वाघोलीकर धन्वंतरीचे ठरले आहेत. तर संगमनेरच्या वैद्यकीय सेवेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. याबद्दल त्यांचे वैद्यकीय क्षेत्रासह नागरिकांतून कौतुक होत आहे.