कोपरगावात मूर्ती संकलनास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
कोपरगावात मूर्ती संकलनास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
पालिका प्रशासनास गणेश भक्त व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी तसेच जलप्रदूषण होऊ नये यासाठी कोपरगाव प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी केली होती. यावर्षी नागरिकांना थेट गोदावरी नदी पात्रात गणेश विसर्जन करू नये असे आदेशही प्रशासनाने प्रसारित केले होते. त्यानुसार पालिकेच्यावतीने मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पालिकेने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर प्रशासनाच्या नियमांचे पालन करत आपले घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन केले. नगरपालिका प्रशासनाने सर्व मूर्तींचे विधिवत पूजन करून विसर्जन केले. नागरिकांनीही पालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक करत भरभरून प्रतिसाद दिला. सर्व संकलन केंद्रावर सकाळपासून पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे अधिकारी कर्मचार्यांसह बारकाईने लक्ष ठेऊन होते. त्यांच्या सोबत मदतीला कोपरगावतील अनेक गणेश भक्त व सामाजिक कार्यकर्ते मूर्ती संकलन केंद्रावर उभे राहून नागरिकांचे प्रबोधन करत होते.
यावेळी गोदावरी तिरावर पालिका स्वछतादूत व गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ ढाकणे व त्यांच्या सहकार्यांनी स्वतः मूर्ती संकलन केंद्रावर उभे राहून गणेश मूर्तींचे संकलन केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व यशस्वी मुकाबला करण्यासाठी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने विसर्जन मिरवणूक आणि नदीतिरावर विसर्जन करण्यास मनाई केली होती. त्यास नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याबद्दल पालिका प्रशासनाने नागरिकांचे आभार मानले आहे.