भक्तांना दर गुरुवारी ‘साई आमटी’चा प्रसाद

नायक वृत्तसेवा, शिर्डी 
साईभक्तांसाठी दर गुरुवारी श्री साईप्रसादालयात विशेष ‘साई आमटी’ प्रसाद रूपाने दिली जाणार आहे. कमी तेल, कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम, तसेच खनिजांनी समृद्ध असल्याने ही आमटी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या आमटीची खासियत म्हणजे तिच्या डाळींचे अनोखे मिश्रण. मूग डाळ, मठ डाळ व हरभरा डाळीचा समतोल वापर केल्यामुळे त्यात प्रथिनांचे प्रमाण भरपूर आहे. त्यात खोबरे आणि शेंगदाण्याचा हलका स्पर्श आमटीला खास चव देतो. चव व सुवास वाढवण्यासाठी कांदा, आले-लसूण पेस्ट, हळद, हिंग, हिरवी मिरची, मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार मीठाचा वापर केला जातो. मोहरी, जिरे व कढीपत्त्याची फोडणी देऊन तयार केलेली ही आमटी कोथिंबिरीने सजवली जाते.
साई मंदिरातील प्रसाद भोजनाचा भाग म्हणून ही पौष्टिक आमटी, चपाती किंवा गरम भातासोबत भक्तांना दिली जाईल. साईभक्तांच्या आवडीनुसार तयार करण्यात आलेली ही आरोग्यदायी साई आमटी ‘सात्विक अन्नातून सेवा’ या परंपरेचा संदेश देत प्रसादातील चवीला नवी ओळख देईल असा विश्वास साई संस्थानने व्यक्त केला आहे.
Visits: 248 Today: 1 Total: 2363961

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *