प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 205 लाभार्थी अपात्र देवळाली प्रवरा येथील प्रकार; लाभ घेतलेली रक्कम परत करण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 205 अपात्र खातेदारांकडे असलेल्या सुमारे 17 लाख रुपये रक्कमेची नावासह यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी एक लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु, उर्वरित खातेदारांनी घेतलेले पैसे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन कृषी विभाग व तलाठी कार्यालयाच्यावतीने करण्यात आल्याने अपात्र खातेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत राज्यातील शेतकर्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. ही मदत वर्षातून दर चार महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात शेतकर्यांच्या बँकखाती जमा करण्यात येते. परंतु या योजनेमध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी शासनाकडे दाखल झाल्याने शासनाने याची दखल घेऊन आयकर विभागाने लाभार्थींच्या खात्याची चौकशी केली असता यामध्ये काही अपात्र खातेदार आढळून आले आहेत. मात्र, या खातेदारांनी पाच, चार, तीन व दोन हप्त्यातील रकमा घेतलेल्या आहेत. या रकमा दहा हजारांपासून चार हजारापर्यंत असून याचे लाभार्थी 205 असल्याने हा आकडा मोठा आहे.

याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील नावासमोरील रक्कम पुन्हा शासनजमा करावयाची आहे. ही रक्कम तलाठी कार्यालयात रोख स्वरूपात भरून आपणास पैसे भरल्याची पावती मिळणार आहे. सर्व खातेदारांनी तलाठी कार्यलयात येऊन आपल्या नावासमोरील रक्कम भरून त्याची पावती घ्यावी व शासनास सहकार्य करावे, अशी विनंती तलाठी दीपक साळवे यांनी केली आहे.
