‘नवरदेव’ ला कोल्हेवाडीत रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोल्याचे सुपुत्र निरंजन देशमुख यांची निर्मिती असलेल्या ‘नवरदेव’ या चित्रपटाने सध्या जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.शेतकरी मुलांच्या लग्नाचा ज्वलंत प्रश्न उचलून धरत निरंजन देशमुख यांनी या चित्रपटातून वास्तववादी चित्र उभे केल्याने या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

तालुक्यातील कोल्हेवाडी येथील हनुमान मंदिरासमोरच्या मैदानावर ‘नवरदेव’ या शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर असलेल्या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील ग्रामस्थ तसेच स्वयंसेवी संस्थांनी या सामाजिक जनजागृती करणाऱ्या चित्रपटाचे आयोजन केले होते.मोबाईलच्या काळात आणि सोशल मीडियाच्या युगात एलईडी स्क्रीनवर चित्रपट बघायला ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.२ तास २५ मिनिटांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.चार विषयानुरूप गाणे असलेला हा चित्रपट अतिशय शांततेने प्रेक्षकांनी शेवटपर्यंत बघितला आणि चित्रपट संपल्यानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देखील दिल्या.
शेतकरी मुलांच्या लग्नाचा ज्वलंत प्रश्न सध्या गावोगावी प्रचंड उग्ररूप धारण करत असून या विषयावर चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर प्रथमच निरंजन देशमुख यांनी नियोजनातून प्रबोधनाचा विडा उचलला असून गावोगावी त्यांच्या या संकल्पनेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अकोले तालुक्यातील कोतुळ येथील निरंजन देशमुख यांची निर्मिती आणि मुख्य भूमिका असलेल्या ‘नवरदेव’ चित्रपटाला तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. समाज प्रबोधन करणारा हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक गावात दाखविला जावा, या चित्रपटाची गरज संपूर्ण महाराष्ट्राला आहे, जनजागृती होणे गरजेचे आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Visits: 112 Today: 5 Total: 1109440
