मराठा आरक्षणासाठी समाजासोबत रस्त्यावर उतरण्यासही तयार ः विखे भाजपचा संघटनांशी संवाद; जिल्ह्यातील शेवगावपासून सुरूवात

नायक वृत्तसेवा, शेवगाव
मराठा समाजाला तात्पुरता दिलासा देत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या नव्या निर्णयानंतर मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ आता घेणार आहे. मात्र असं असलं तरीही भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ‘आरक्षणासंबंधी मराठा समाज जी भूमिका घेईल, त्याला पक्षीय भूमिका आड येऊ न देता भाजपचा पाठिंबा असेल. यासंबंधी कायदेशीर लढाईचा विचार सुरू आहेच, मात्र वेळ आली तर उद्या समाजासोबत आम्ही रस्त्यावरही उतरण्यास तयार आहोत,’ असा इशारा भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्यावतीने मराठा आंदोलनातील सहभागी संघटनांच्या प्रतिनिधींशी तसेच समाजातील सर्वच घटकांशी संवाद साधण्यात येत आहे. यासाठी विखे पाटील यांच्याकडे नगर आणि नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार विखे यांनी सोमवारी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेत मराठा समजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

नगर जिल्ह्यातील दौर्‍याची सुरुवात त्यांनी शेवगाव तालुक्यापासून केली. आमदार मोनिका राजळे याही यावेळी उपस्थित होत्या. शेवगाव येथे लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर एका मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मराठा समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला.

यावेळी विखे पाटील म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या निकालानंतर मराठा समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. आघाडी सरकार अद्याप ठोस अशी कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळेच आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे काय करता येईल, हे जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केलं आहे. पक्षीय पातळीवर मराठा आरक्षणाच्या संदर्भात कायदेशीर लढाई करण्याबाबत विचार सुरू आहेच. परंतु उद्या रस्त्यावरची लढाई करण्याची वेळ आल्यास पक्षीय भूमिका बाजूला ठेवून आम्ही समाजासोबत आहोत. तुम्ही फक्त हाक द्या,’ आशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेण्यात येणार आहेत. भाजपच्या पदाधिकार्‍यांसह मराठा समाजाच्या प्रतिनिधींना बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 115460

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *