संगमनेर शहरातील चोहोबाजूच्या मटका पेढ्यांवर पोलिसांचे छापे! नाशिक, श्रीरामपूर व संगमनेर पोलिसांची स्पर्धात्मक कारवाई; शहरात मात्र उलटसुलट चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध घटना आणि घडामोडींमुळे सतत चर्चेत असलेल्या संगमनेरात सोमवारी दुपार नंतर घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींनी शहरातील चौकाचौकात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्याचे कारणही तसेच आहे, एरव्ही पोलिसांच्या नाकावर टिच्चून म्हणा किंवा त्यांच्याच पाठबळाने म्हणा शहरात सुरु असणार्‍या मटका पेढ्यांवर नाशिक, श्रीरामपूर व संगमनेर पोलिसांनी एकामागून एक छापे घालीत तब्बल 28 जणांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईत मोठ्या कालावधीनंतर पहिल्यांदाच शहरातील मटकाकिंग असलेल्या इसमावरही थेट गुन्हा दाखल झाला. या कारवाईने एकीकडे अवैध धंदेवाईकांमध्ये खळबळ उडाली तर दुसरीकडे शहरात उलटसुलट चर्चांना उधाणही आले. या कारवाईत पोलिसांच्या विविध पथकाने सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूरच्या अप्पर अधीक्षकांच्या पथकाने देवीगल्ली येथील झुंजूरवाड्यावर यातील पहिली कारवाई केली. या कारवाईत कल्याण नावाचा जुगार (मटका) खेळत असतांना दिलीप रघुनाथ ढगे (वय 70, रा.रंगारगल्ली), रवींद्र श्रीधर रुपवते (वय 41, रा.साईनगर), अफझल अन्सार पठाण (वय 35, रा.नाईकवाडपूरा), सुनील दामू गायकवाड (वय 38, रा.इंदोरी, ता.अकोले), राहुल मच्छिंद्र मुसळे (वय 26, रा.अकोले नाका), घनश्याम रमेश जेधे (वय 49, रा.जेधे कॉलनी), युसुफ मिठुभाई सय्यद (वय 50, रा.अलकानगर), सुरेश गंगाधर झोळेकर (वय 47, रा.अकोले), वाहीद अजीज पठाण (वय 23, रा.सय्यदबाबा चौक), सय्यद मुश्ताक फकीर मोहंमद (वय 62, रा.देवीगल्ली), सोमनाथ सुखदेव गोर्डे (वय 52, रा.कोल्हेवाडी) व हौशीराम नारायण बांगर (वय 23, रा.देवगाव) अशा बारा जणांवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून 49 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत त्यांना अटक करण्यात आली.

दुसरी कारवाई नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने नाशिक रस्त्यावरील केसेकर कॉम्प्लेक्सच्या परिसरात केली. या कारवाईत 55 हजार रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी सुरेश भाऊराव अभंग (वय 45, रा.बटवालमळा), गणेश निवृत्ती पाठक (वय 67, रा.देवाचा मळा), राकेश अशोक चिलथा (वय 42, रा.ऐश्वर्या पेट्रोल पंपाच्या मागे), यासीन उस्मान शेख (वय 42, रा.घुलेवाडी), संदीप दत्तू काकडे (वय 35, रा.साईनगर), संपत गणाजी वैराळ (वय 68, रा.इंदिरानगर), जालिंदर देवराम सातपुते (वय 68, रा. गणेशनगर), अशोक तुकाराम पावडे (वय 63, रा.राजापूर), गणपत भिमाजी सातपुते (वय 59, रा.सुकेवाडी), निवृत्ती रहादु वर्पे (वय 70, रा.गणेशनगर), शंकर दत्तात्रय इटप (मटकाकिंग, पसार) यांच्यावर गुन्हे दाखल करीत यातील पहिल्या दहाजणांना अटक करण्यात आली आहे.

वरीष्ठ कार्यालयांकडून आपल्या कार्यक्षेत्रात अचानक झालेल्या कारवाईची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांची एकच धावपळ उडाली आणि त्यांनीही आपल्यावर बालंट नको म्हणून शहरातील अन्य मटका पेढ्यांवर कारवाईचा फार्स राबविला. यात कासट संकुलासह तेलीखुंट, नेहरु चौक, अकोले बायपास रोड व कुरणरोड येथील पेढ्यांवर छापे घातले गेले. विशेष म्हणजे वरीष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने केलेल्या दोनच कारवायांत मुख्य मटकाकिंगसह एकूण 23 जणांवर गुन्हे दाखल झाले, तर शहर पोलिसांनी तब्बल पाच ठिकाणी छापे घालूनही केवळ प्रत्येक ठिकाणचा एकच ‘पंटर’ अशा एकूण केवळ पाच जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. ही संख्याच संगमनेर शहर पोलिसांची ‘प्रामाणिकता’ सिद्ध करणारी ठरली आहे. या कारवायांची वार्ता शहरात पसरताच चौकाचौकात त्याच्या गमतीशीर चर्चाही सुरु झाल्या.


कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु होणारा कोणताही अवैध व्यवसाय पोलिसांची नजर चुकवून सुरू राहूच शकत नाही. सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व संगमनेर शहर पोलिसांनी केवळ ‘मटका’ हा एकमेव अवैध व्यवसाय लक्ष्य करीत तब्बल सात ठिकाणी छापे घातले. पोलिसांच्या मर्जीशिवाय जेथे एखादाही असा धंदा सुरू होऊ शकत नाही, तेथे एकाचवेळी सात ठिकाणी छापे आणि तब्बल 28 जणांवर झालेली कारवाई संगमनेरात विस्तारलेला मटका व्यवसाय दाखवण्यास पुरेशी आहे. याच विषयावरुन सोमवारी शहरातील चौकाचौकात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.

Visits: 9 Today: 1 Total: 80708

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *