कोरोना मृत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना अगस्ति कारखान्याने मदत करावी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखाना प्रशासनाकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति सहकारी साखर कारखान्याने कोरोना संसर्गाने मयत झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांस आर्थिक मदत करावी, अशा आशयाचे निवेदन नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कारखाना प्रशासनास देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांतच कोरोनाचा कहर वाढला व अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे बहुतेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले. बहुतेकांनी दवाखान्याचे लाखो रुपये बिल भरले. त्यातून काही कर्मचारी बरे झाले. दुर्दैवाने आत्तापर्यंत दहा कर्मचारी मयत झाले. घरची परिस्थिती बेताची असलेल्या शेतकरी कुटुंबातील कर्मचार्यांच्या कुटुंबियांनी लाखो रुपये बिल भरुनही आपला करता पुरुष गमवावा लागल्याने त्यांच्यावर खूपच वाईट वेळ आलेली आहे. कर्मचारी चालवत असलेल्या अगस्ति सांस्कृतिक मंडळाच्यावतीने कर्मचार्यांनी प्रत्येकी एक दिवसाचे वेतन देऊन मृत कर्मचार्यांस एक लाख रुपयांची मदत केली आहे. अशाप्रकारे अगस्ति सांस्कृतिक मंडळाच्यावतीने दहा कर्मचार्यांना दहा लाखांची मदत दिली आहे. परंतु ज्या संस्थेत त्यांनी आयुष्यभर काम केले व काम करताना व्याधीग्रस्त झाले अशा सर्व कर्मचार्यांना कारखान्याने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करावी.

तसेच कर्मचार्यांचे व ऊस उत्पादकांचे उसाचे थकीत पेमेंट करावे. याचबरोबर यावर्षीची एफ.आर.पी.ची रक्कम एकरकमी ऊस ऊत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असे निवेदन प्रभारी कार्यकारी संचालक एकनाथ शेळके यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश नवले, राष्ट्रीय काँग्रेसचे अकोले शहर कार्याध्यक्ष रामदास धुमाळ, संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे, सुनील पुंडे, शुभम आंबरे, शिवाजी नवले, वैभव सावंत, डॉ.भरत नवले, अमोल पवार, सुरेश साबळे आदिंच्या सह्या आहेत.
