साकूरमधील मद्यपींचा हनुमान मंदिरातच दररोज धिंगाणा! घारगाव पोलिसांकडून मात्र तक्रारदारालाच कारवाईच्या धमक्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वादग्रस्त कारकीर्द ठरलेल्या पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यावर घारगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातूनही तक्रारीचा सूर उमटू लागला आहे. साकूर येथील हनुमान मंदिरात काही समाजकंटक मद्यपान व धुम्रपान करीत असल्याने मंदिराची विटंबना होत असल्याची तक्रार देणार्यालाच घारगावचे निरीक्षक पाटील दमबाजी करीत आहेत. अशा आशयाची तक्रार संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांकडे दाखल झाल्याने घारगाव पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या घटनेतून सामाजिक सौहार्दालाच धक्का लागण्याची शक्यता असूनही घारगाव पोलिसांनी या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.
याबाबत साकूर येथील सुनील नामदेव इघे यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून साकूर गावातील हनुमान मंदिरात काही समाजविघातक प्रवृत्तीची माणसं गोळा होतात. मंदिराच्या गाभार्यातच त्यांच्याकडून मद्यपानासह धूम्रपान व अन्य उद्योग सुरु आहेत. त्यामुळे मंदिराचे पावित्र्यच धोक्यात आलेले आहे. या गोष्टी थांबाव्यात व देवालयांचे पावित्र्य जपले जावे यासाठी साकूरचे रहिवासी सुनील इघे यांनी पुढाकार घेत घारगाव पोलिसांना याची माहिती देण्यासाठी तक्रार अर्ज दिला.
खरेतर असा प्रकार घडत असेल तर तो बहुसंख्य असलेल्या एका धर्माच्या पवित्रस्थळाची विटंबनाच आहे. आपल्या परिसराची शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना अशी कृत्ये समजताच धडक कारवाईची अपेक्षा आहे. मात्र घारगावात याउलट घडल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. घारगावचे निरीक्षक सुनील पाटील यांनी तक्रारदार इघेंनाच पोलीस ठाण्यात बोलावून अत्यंत हिन वागणूक दिली. त्यांना शिवराळ भाषेत शिव्या देत मंदिरात बसून दारु रिचवणार्यांसमोर त्यांचा पानउतारा केला. एव यावरच न थांबता निरीक्षक साहेबांनी संशयीत आरोपींच्या समोरच ‘पुन्हा असा अर्ज द्याचा नाही, दिलास तर तुझ्यावरच गुन्हा दाखल करुन तुला गजाआड करेल’ असा सज्जड दमच त्यांनी तक्रारदाराला भरल्याचे इघे यांनी प्रांताधिकार्यांना दिलेल्या अर्जात केला म्हंटले आहे.
या सर्व प्रकारातून हतबल झालेल्या तक्रारदाराने अखेर न्याय मिळावा व आपल्या भावनांचा सन्मान व्हावा, गावातील मंदिराचे पावित्र्य अबाधित रहावे यासाठी संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांना अर्ज देवून साकूरमधील हनुमान मंदिरात मद्यपींकडून सुरु असलेली धार्मिक प्रतिकांची विटंबना थांबवावी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या अर्जावर कारवाई न झाल्या मंगळवार 1 जूनरोजी प्रांताधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी आपल्या अर्जातून दिला आहे. त्या अर्जावर प्रांताधिकारी काय निर्णय घेतात याकडे आता साकूरसह पठाराचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही काळापासून जातीय तणावाच्या काही गोष्टी घडल्याने साकूर चर्चेत आहे. अशातच तेथील हनुमान मंदिरात काही समाजकंटकांकडून मद्यपान व अन्य उद्योग सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून या गंभीर मुद्द्याची दखल घेवून कारवाई करण्याची गरज होती. तसेच तर धडले नाहीच, मात्र त्याविषयी माहिती वजा तक्रार देणार्यालाच गुन्हेगार ठरवून त्याला संशयितांसमोर अपमानित करण्याचा हा प्रकार पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची कार्यपद्धती स्पष्ट करणारा आहे. घारगाव पोलिसांनी ही भूमिका अत्यंत चुकीची असून त्यातून पठारावरील शांततेला धक्का लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचा पदभार असतांना पोलीस निरीक्षक सुनील पाटील अनेक प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरले होते. प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांचे प्रकरण असो अथवा देवगाव जवळील वाळू तस्करीतून तिघा तरुणांचा गेलेला बळी असो अशा अनेक प्रकरणातून पो.नि.पाटील यांचा मनमानीपणा उघडपणे समोर आला होता. त्यानंतर त्यांची घारगावला बदली झाली, किमान तेथील कारकीर्द तरी स्मरणीय राहील असे वाटत असतांना आता पठारातूनही त्यांच्या ‘गुन्हेगारांवरील प्रेमा’चे किस्से समोर येवू लागल्याने घारगाव पोलीस आणि पो.नि.पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गंभीर गोष्टीकडे लक्ष्य देण्याची गरज आहे. अन्यथा गेल्या काही दिवसांपासून खद्खद्णार्या साकूरचे सामाजिक स्वास्थ खराब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.