उत्पादन शुल्कचे अधिकारी भासवून हॉटेल चालकाला लुटले शेडगाव येथील घटना; काही तासांतच दोघांच्या आवळल्या मुसक्या

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल चालकाची 25 हजारांची लूट केली. ही घटना शुक्रवारी (ता.28) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. आश्वी पोलिसांनी तातडीने हालचाली करुन काही तासांतच भीमराव वाघमारे व रामेश्वर शिंदे (दोघेही रा.सिन्नर, जि.नाशिक ) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत सुनील माधव फड (रा.शेडगाव) यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, माझे शिबलापूर (ता.संगमनेर) रस्त्यावरील शेडगाव शिवारात न्यू हॉटेल नावाने आहे. मी माझा भाऊ अनिल सोबत शुक्रवारी सायंकाळी बंद हॉटेलच्या अंगणात बसलेलो होतो. त्याचवेळी तेथे (एमएच.15, जीआर.6887) या क्रमांकाच्या वाहनातून पाच व्यक्ती आल्या. आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असून, हॉटेलचे रजिस्टर तपासण्यासाठी हॉटेल उघडण्यास सांगितले. त्यानंतर त्यातील एकाने कोरोना काळात हॉटेल का उघडले असे सांगत, परवाना रद्द करण्याची धमकी दिल्याने फड बंधू घाबरले.

त्यानंतर वाहनात बसलेल्या साहेबाला सांगतो, असे सांगून हे प्रकरण मिटवण्यासाठी 25 हजारांची मागणी केली. त्याप्रमाणे सुनील फड यांनी घरातून त्यांना पैसे आणून दिले. पैसे हातात पडताच त्यांनी चपळाईने वाहन गाठल्याचे पाहून फड यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते भरधाव वेगाने निघून गेले. त्यांचा संशय आल्याने फड बंधूंनी त्यांचा आश्वीच्या पेट्रोलपंपापर्यंत पाठलाग केला, मात्र ते दुचाकीला कट मारुन निघून गेले.

याप्रकरणी शनिवारी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनाच्या क्रमांकावरुन तपास करुन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, विनोद गंभीरे व त्यांच्या सहकार्यांनी भीमराव वाघमारे व रामेश्वर शिंदे यांना सिन्नर येथून अटक केली. तर इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.
