संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे जोरदार स्वागत          तळेगाव दिघे येथे फटाक्यांची आतषबाजी ; देहभान विसरून हरिनामाचा गजर


नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्शनासाठी देहभान विसरून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्याचे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे मंगळवारी ( दि. १७ ) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पदाधिकारी व ग्रामस्थांनी टाळ मृदंगाच्या गजरात जेसीबीतून फुलांची उधळण करीत आणि फटाक्याच्या आतषबाजीत जोरदार स्वागत केले. यानिमित्ताने भगवंत भक्तीचा महासागर लोटला होता.

 तळेगाव दिघे येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखीचे आगमन होताच आजी – माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व विविध तरुण मंडळाकडून भाविकांचे आदरतिथ्य करण्यात आले. दिंडीमध्ये सुमारे पन्नास हजाराहून अधिक भाविक मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने सहभागी झाले आहेत. हरिनामाचा गजर करत, टाळ  मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात हे वारकरी तल्लीन झाले होते. ठिकठिकाणी मोठ्या आनंदाने भक्तिभावाने लेझीम पथक, पारंपरिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडीचे  स्वागत करीत दर्शन घेतले. यानिमित्ताने ‘सुखी संसाराची तोडूनिया गाठ.. ‘पाऊले चालती पंढरीची वाट.., सुखी संसाराची तोडूनिया गाठ..’ याची अनुभूती आली. दिंडीत सहभागी महिला-पुरुष भाविक, वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत सर्वांच्या समवेत अभंग गायले. हरिनामाचा गजर आणि भक्तीमय वातावरणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता.  संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे आणि पालखी सोहळ्याचे अध्यक्ष नवनाथ महाराज गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा मजल-दरमजल करीत श्रीक्षेत्र पंढरपुरकडे मार्गक्रमण करीत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी पालखी व दिंडीच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खांद्यावर भगव्या पताका घेवून हरिनामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
Visits: 589 Today: 1 Total: 1802165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *