संगमनेर शहरातील कत्तलखाने व मटका पेढ्यांवर पोलिसांचे छापे! वरीष्ठांकडून कानउघडणी; प्रदीर्घ कालावधीनंतर शहर पोलिसांची मटका पेढ्यांवर कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘सुसंस्कृत संगमनेरच्या चोहोबाजूला ‘अवैध’ दारुचा खंदक!’ या मथळ्याखाली दैनिक नायकमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा परिणाम पोलिसांच्या कारवायात झाल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांत शहर पोलिसांनी आपल्या हद्दितील किरकोळ दारु विक्रेत्यांना लक्ष्य करीत एकामागून एक कारवाया केल्या होत्या. त्याचवेळी शहरात सुरु असलेल्या अन्य अवैध व्यवसायाकडे मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. त्यावरुन गेल्या शुक्रवारी दैनिक नायकने आपल्या मुख्य बातमीतून पोलिसांच्या या कारवाया किरकोळ दारु विक्रेत्यांपर्यंतच मर्यादीत असून उर्वरीत सर्व अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याकडे पोलिसांचे लक्ष्य वेधले होते, त्याची दखल घेत वरीष्ठ अधिकार्‍यांनी कानउघडणी केल्यानंतर रविवारी शहर पोलिसांनी मटका पेढ्यांसह जमजम कॉलनीतील कत्तलखान्यांवर छापेमारी केली. यावेळी कल्याण नावाचा मटका चालविणार्‍या तिघांसह पोलिसांनी आठ गोवंश वासरांची मुक्तता केली. या वृत्ताने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असली तरीही त्यातून पोलिसांची दुहेरी भूमिकाही स्पष्टपणे समोर आली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील पोलिसांच्या पथकाने गेल्याकाही दिवसांपासून लक्ष्य केंद्रीत केलेल्या अवैध किरकोळ दारु विक्रीकडे दुर्लक्ष करीत मटका आणि गोवंश कत्तलखान्यांवर कारवाई केली. यावेळी तीनबत्ती चौकातील जहागिरदार वाड्यावर मारलेल्या छाप्यात पोलिसांनी हमीद नवाब शेख (वय 37, रा.संगमनेर खुर्द) व पुरुषोत्तम केशव धात्रक (वय 43, रा.मोमीनपुरा) या दोघांना कल्याण नावाचा हारजीतीचा जुगार खेळतांना रंगेहाथ पकडले. यावेळी या दोघांकडून 2 हजार 550 रुपयांच्या रोकडसह आकडे लिहिलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या व जुगाराचे अन्य साहित्यही जप्त केले.

मटक्यावरील दुसरी कारवाई जुन्या पोस्टाजवळ करण्यात आली. येथील सागर दगडू उगले (वय 34, रा.माधव चित्र मंदिराजवळ) हा इसम एका टपरीच्या आडोशाला कल्याण मटक्याच्या चिठ्ठ्या घेत असतांना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याच्याकडे 1 हजार 100 रुपयांची रोकड आणि ग्राहकांकडून घेतलेल्या आकड्यांच्या नोंदीसह जुगाराचे अन्य साहित्यही जप्त करण्यात आले. पो.कॉ.सचिन उगले, अविनाश बर्डे व पो.ना.व्ही.जी.धादवड यांच्या फिर्यादीवरुन या तिघांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यासह मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून वरकरणी बंद असलेला ‘मटका’ कोविडच्या भयातही सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे.

दुपारच्या सत्रात शहरातील ‘बंद’ दाखवण्यात आलेल्या मटक्यावर कारवाई केल्यानंतर रात्री पोलिसांनी आपला मोर्चा कत्तलखान्यांच्या दिशेने वळवला. भारतनगर व जमजम कॉलनी परिसरात पोलिसांनी एकामागून एक वाड्यांवर छापे घातले. मात्र पोलिसांच्या सांगण्यानुसार सर्व वाड्यांमधील एकाही ठिकाणी कत्तल होत असल्याचे आढळले नाही. मात्र जमजम कॉलनीतील काटवनात काही जनावरे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे तपासणी केली असता पोलिसांना अत्यंत निर्दयीपणाने कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली गोवंशाची आठ नवजात वासरे आढळून आली. त्यांची मुक्तता करण्यात आली. या बाबत पो.कॉ.अविनाश बर्डे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने लपूनछपून का असेना मात्र शहरातील कत्तलखाने सुरु असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांत शहर पोलिसांनी एका मागोमाग कारवाया करीत शहरातील किरकोळ दारु विक्रेत्यांना लक्ष्य केले होते. मात्र त्याचवेळी शहरात सुरु असलेल्या मोबाईल मटक्यासह गांजा, चरस व अन्य अंमलीपदार्थांसह वाळू व जुगार या धंद्यांकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. याबाबत दैनिक नायकने शुक्रवारच्या (ता.28) अंकातून ‘सुसंस्कृत संगमनेरच्या चोहोबाजूला ‘अवैध’ दारुचा खंदक! शहरातील गल्लीबोळात बेकायदा धंदे; पोलिसांकडून मात्र फक्त ‘किरकोळ’ दारु विक्रेतेच लक्ष्य’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत वरीष्ठ अधिकार्‍यांनी कानउघडणी केली. त्याचा परिणाम पोलिसांनी अवैध दारुसह आता अन्य बेकायदा व्यवसायांवरील कारवायांवरही झाल्याने अनेकांनी दैनिक नायकच्या कार्यालयात फोन करुन समाधान व्यक्त केले आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 113047

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *