जाखुरी प्रकरणात पतीच निघाला पत्नीचा मारेकरी! तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा; ताब्यात असलेल्या आरोपीला अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रात्री पाहुणा म्हणून आलेल्या पहिल्या पत्नीच्या प्रियकराने जंगलात नेवून तिचा खून केल्याचे कथानक उभारुन तपास भरकटवण्याचा प्रयत्न हाणून पाडताना संगमनेर तालुका पोलिसांनी जाखुरी प्रकरणात सुरुवातीपासूनच संशयीत असलेल्या मयतेच्या पतीला अटक केली आहे. प्रारंभीक तपासात त्याने दुसर्या पत्नीसोबत सुखाने संसार सुरु असताना पहिलीने नांदण्याचा तगादा लावल्याने त्याच्या रागातून तिचा खून केल्याचे कबूल केले आहे. मात्र पोलिसांना त्यावर भरवसा नसून रात्री ‘पाहुणा’ म्हणून आलेला ‘तो’ अचानक ‘गायब’ कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर शोधले जात आहे. या प्रकरणाला अनैतिक संबंधांची किनार असून आरोपीने मयतेच्या प्रियकरावरही जीवघेणा हल्ला केल्याची मात्र प्रसंगावधान राखून त्याने पळ काढल्याची चर्चा सध्या सुरु असून पोलिसही त्यादृष्टीने तपास करीत आहेत. या प्रकरणी आज पहाटे अटक केलेल्या भारत मोरे याला दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्याच्या कोठडीतून या खुनामागील वास्तव कारण उघड होण्याची शक्यता आहे.

याबाबत मयत संगिता भारत मोरे यांचा भाऊ अरुण माळी (रा.येवला) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी भारत मोरे याचे दोन लग्न झाले होते. त्याची पहिली पत्नी व फिर्यादीची बहिण सध्या नागमठाण, ता.वैजापूर येथे वास्तव्यास होती. तर, आरोपी दुसरी पत्नी अलकासह जाखुरीतील मांडेमळा परिसरात मोलमजुरी करुन रहात होता. फिर्यादीच्या बहिणीला त्याच्यासोबत संसार करायचा असल्याने ती सोबत राहण्यासाठी एकसारखा तगादा करायची. मात्र आरोपीला तिला सोबत ठेवायचे नसल्याने त्या वादातून त्याने संगिता मोरेचा हाताने गळा आवळून खून केल्याची तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आज पहाटे अडीच वाजता पूर्वीच्या अकस्मात मृत्यू नोंदीत बदल करुन आरोपी भारत रामभाऊ मोरे (वय 48, मूळ नागमठाण, ता.वैजापूर ह.मु.जाखुरी, ता.संगमनेर) याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (।) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पहाटे तीन वाजता त्याला अधिकृत अटक केली.

प्राथमिक चौकशीत आरोपी मोरे याने पहिल्या पत्नीचा नांदण्यासाठी एकसारखा आग्रह सुरु असल्याने त्या रागातूनच सदरचा प्रकार घडल्याची कबुली दिली आहे. मात्र पोलिसांना त्यावर भरवसा नसून आरोपी चुकीची माहिती देवून तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. आज दुपारनंतर त्याला न्यायालयात हजर करुन कोठडी मागितली जाणार असून त्यानंतरच खुनामागील खर्या कारणाचा शोध लागणार आहे. या प्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासूनच त्याच्यावर संशय असल्याने सोमवारी (ता.11) सकाळी हा प्रकार उघड झाल्यानंतर तत्काळ त्याला ताब्यात घेण्यात आले होते. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात मयतेच्या शवविच्छेनानंतर तिचा मृत्यू गळा दाबल्यानेच झाल्याचे समोर आल्यानंतर आज पहाटे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत त्याला गजाआड टाकले.

या घटनेत बळी गेलेली संगिता भारत मोरे ही आठ दिवसांपूर्वीच जाखुरीत पतीकडे वास्तव्याला आली होती. त्या दरम्यान रविवारी (ता.10) मयतेचा कथित प्रियकर भागीनाथ चांगदेव माळी (रा.नागमठाण, ता.वैजापूर) हा जाखुरीत त्यांच्या घरी आला. रात्री नऊच्या सुमारास आरोपी भारत मोरेसह त्याच्या दोन्ही बायका, ‘पाहुणा’ भागीनाथ माळी, आरोपीचे व्याही सोमनाथ सुरसे, त्यांची पत्नी व मुलगा अशा सर्वांनी सोबत जेवण केले व ते सर्वजण झोपी गेले. सोमवारी (ता.11) सकाळी सहाच्या सुमारास आरोपी प्रातःर्विधीसाठी घरामागील वनविभागाच्या जंगलात जात असताना त्याला त्याच्या पत्नीचा मृतदेह दिसला, त्यावेळी रात्री आलेला ‘तो‘ पाहुणाही ‘गायब’ असल्याची खबर आरोपीने पोलिसांना दिली होती.

प्रत्यक्षात मात्र आरोपीने रविवारी रात्री त्याच्या पहिल्या पत्नीसह तिच्या प्रियकराचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून वेळीच तिचा प्रियकर जीव मुठीत धरुन पळाल्याने वाचला, मात्र संगिता मोरे या महिलेला त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करता आली नाही आणि तिचा मृत्यू झाला अशी जोरदार चर्चा परिसरात सुरु आहे. या घटनेनंतर ‘गायब’ झालेल्या मयतेचा कथित प्रियकराचा मोबाईलही बंद झाल्याने सुरुवातीला या घटनेचे ‘गुढ’ वाढले होते. मात्र सलामीलाच खुनाचा गुन्हा तपासाला आलेल्या पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी शिताफीने कड्या जोडताना आरोपीला सुरुवातीपासूनच ताब्यात ठेवले व खून झाल्याचा अहवाल प्राप्त होताच त्याला गजाआड केले. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून खुनामागील कारणांबाबत वेगवेगळ्या चर्चाही सुरु आहेत.

पदभार स्वीकारताच खुनाच्या गुन्ह्याचा तपास हाती आलेल्या तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी या घटनेचा क्रम लक्षात घेत सकाळीच आरोपीला ताब्यात घेतल्याने उघड होताच गुन्ह्याचा शोध लागल्यात जमा होता. आज पहाटे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष कळवल्यानंतर पोलिसांनी अकस्मात दप्तर बदलून खुनाचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीला गजाआड टाकले. सुरुवातीच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याच्या कबुलीसह नांदण्यास येण्यावरुन वाद झाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र खुनामागील कारण वेगळेच असल्याचा पोलिसांनाही संशय असून प्रसंगी चौकशीसाठी मयतेच्या कथित प्रियकरालाही पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.

