राहुरीमध्ये रुग्णवाहिका लोकार्पणवरुन रंगले मानापमान नाट्य तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णवाहिकेअभावी होतेय हेळसांड

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यासाठी पाच रुग्णवाहिका आल्यानंतर त्यातील उंबरे ग्रामीण रुग्णालयाच्या एका रुग्णवाहिकेची जिल्हा परिषद सदस्या शशीकला पाटील व पंचायत समिती सदस्य उदयसिंह पाटील यांनी या लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्यावरुन राहुरी पंचायत समितीत चांगलेच मानापमान नाट्य रंगल्याचे पहायला मिळाले.

रुग्णांसाठी व नागरिकांना वापर व्हावा, या हेतूने रुग्णवाहिका तत्काळ उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आली. या लोकार्पण सोहळ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राहुरी पंचायत समितीच्या काही तथाकथित पदाधिकार्यांनी राजकीय कलगीतुरा सुरू केला आहे. त्यांनी पंचायत समितीच्या काही अधिकार्यांना कार्यालयात बोलावून लोकार्पण सोहळा कोणाला विचारुन केला? त्यासाठी कोणाची परवानगी घेतली होती का? असे उलटसुलट प्रश्न विचारून संबंधित अधिकार्यांना हैराण केल्याने उंबरे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

जिल्हा परिषदेच्या 14 व्या वित्त आयोगातून उंबरे, देवळाली प्रवरा, बारागाव नांदूर, टाकळीमियाँ, मांजरी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 23 मे रोजी रुग्णवाहिका दिल्या होत्या. सध्या कोरोनाची महामारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने या रुग्णवाहिकांची प्रत्येक आरोग्य केंद्रात तातडीची गरज होती. उंबरे येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यामागे अधिकार्यांचा राजकीय हेतू नव्हता. जिल्हा परिषदेच्या फंडातून रुग्णवाहिका आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्या शशीकला पाटील यांच्याही गटामध्ये एक रुग्णवाहिका गेल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य या नात्याने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करण्यात आला असे उत्तर अधिकार्यांनी दिले. ती रुग्णवाहिका उंबरे आरोग्य केंद्रासाठी पाठविली होती असे उत्तर दिल्यामुळे तथाकथित पुढार्यांनी अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी केली.

या पाचही गावातील रुग्णवाहिका ताबडतोब पंचायत समितीमध्ये हजर करा, असा तोंडी आदेश दिल्यामुळे संबंधित अधिकार्यांनी रुग्णवाहिका पंचायत समितीमध्ये हजर केल्या. आता या रुग्णवाहिका पाच दिवसांपासून पंचायत समितीमध्ये उभ्या असल्याने तालुक्यातील अनेक बाधित रुग्णांना नेण्यासाठी खासगी मिळणे मुश्किल होत आहे. असे असतानाही काही तथाकथित पुढार्यांनी फक्त लोकार्पण सोहळ्यासाठी पंचायत समितीमध्ये लावून घेतल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
