जागतिक पातळीवरील ग्लोबल योगासन स्टार’ खेळाडूंची घोषणा पंचवीस देशातील चार हजार स्पर्धकांचा सहभाग; पाच लाखांची पारितोषिके
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील तरुणांमध्ये योग विषयक आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न इंटरनॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन व नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशनकडून सुरु आहे. त्यातूनच ग्लोबल योगास्टार स्पर्धेचे आयोजन केले गेले. या पहिल्याच स्पर्धेला जागतिक पातळीवर मिळालेला मोठा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे. योगात सृष्टीतील सर्व तत्त्वांचा संयोग आहे. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरात 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा व त्यातून विविध रोगांपासून जगाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्पही फेडरेशनने केला आहे. योगचा आधार घेवून ज्या दिवशी संपूर्ण विश्व निरोगी होईल त्या दिवशी आमचे ध्येय साध्य होईल असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे अध्यक्ष तथा योगमहर्षी स्वामी रामदेव बाबा यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने इंटरनॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन व नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानेे जागतिक योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतासह 25 देशातील चार हजारांहून अधिक योगासन खेळाडू सहभागी झाले होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे झालेल्या या पहिल्याच स्पर्धेच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी योगमहर्षी स्वामी रामदेव बाबा होते. सेक्रेटरी जनरल डॉ.एच.आर.नागेंद्र गुरुजी, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे अध्यक्ष उदीत सेठ, सेक्रेटरी जनरल डॉ.जयदीप आर्य यांच्यासह विशेष अतिथी म्हणून हार्ट फुलनेस संस्थेचे अध्यक्ष दाजी कमलेश पटेल व साध्वी भगवती सरस्वती उपस्थित होते. या स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी भूमिका पार पाडली.
यावेळी बोलताना फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ.नागेंद्र गुरुजी म्हणाले की, भारतीय प्राचिन परंपरा असलेल्या योगासनांना जागतिक दर्जा मिळावा, त्याला खेळाचे स्वरुप प्राप्त होवून जगभर त्याचा प्रचार व प्रसार व्हावा. ऑलिम्पिक खेळांमध्येही योगासनांचा समावेश व्हावा असे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगमहर्षी स्वामी रामदेव बाबा यांनी पाहीले आहे. योगासनांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनच्या माध्यमातून मिळालेली संधी भाग्याचे प्रतिक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी 21 जूनपासून सुरु असलेल्या या ग्लोबल स्पर्धेचे सूत्रधार म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. स्पर्धेचे पंच, योगासन खेळाडू यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून गेल्या दोन महिन्यात त्यांनी मोठे परिश्रम घेतल्याने 25 देशातील सुमारे चार हजार स्पर्धकांचा सहभाग असलेली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी ठरल्याचे गौरोद्गारही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हार्ट फुलनेस संस्थेचे अध्यक्ष दाजी कमलेश पटेल यांनी योगासन आपल्या क्षमतेच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने देखील योगचे जीवनातील महत्त्व अधोरेखीत केले असून योगासनातून मनावरील संतुलन कायम ठेवून मन एकाग्र करता येत असल्याचे सांगत आपण नियमितपणे योगासने करीत असल्याचे तिने जाहीरपणे सांगीतल्याचा दाखलाही त्यांनी दिला. पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये योगासनांचा समावेश असावा यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जागतिक योगदिनापासून सुरु झालेल्या या जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी जवळपास पाच लाख रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती. व्हिडिओ आणि छायाचित्राच्या माध्यमातून झालेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील व्हिडिओ स्पर्धेत तृप्ती रमेश डोंगरे (महाराष्ट्र), एस.एस.नव्या (तामिळनाडू), रुद्राक्षी पंकज भावे (महाराष्ट्र), सर्बश्री मंडल (पश्चिम बंगाल) व नेहा कुर्से (कर्नाटक) यांनी तर छायाचित्र स्पर्धेत गायत्री विलास वारे (महाराष्ट्र), रुचिका आर्य व अंकुर आर्य (हरयाणा), नितीन नागर (मध्यप्रदेश) व बिनय भट्टाचार्य (आसाम) यांनी पारितोषिके पटकाविली. भारतीय गटातील विजेत्यांसाठी अनुक्रमे 50 हजार रुपयांचे प्रथम, 25 हजारांचे द्वितीय, 10 हजार रुपयांचे तिसरे, 7 हजार रुपयांचे चौथे व 5 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत व्हिडिओ गटात नेपाळच्या स्पर्धकांची छाप होती. या प्रकरातील पाचही बक्षिसे नेपाळच्या योगासनपटूंनी पटकाविली. त्यात सुनी गुरंग, सुजाना सिल्वाल, मनीषा गुरंग, श्रृती सिंग व प्राजिना गहतराज यांचा समावेश होता. तर छायाचित्रांच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेत व्हिएतनामच्या अम्रिता हॅल्डर, जापानच्या सारा मियामा, गयानाच्या देवानी सिंग, भूतानच्या ओमा माया खडाल आणि कर्मा देमा यांनी पारितोषिके पटकाविली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी 650 डॉलरचे प्रथम, 325 डॉलरचे दुसरे, 125 डॉलरचे तिसरे, 100 डॉलरचे चौथे तर 50 डॉलरचे उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. भारतासह जवळपास 23 देशांतील सुमारे चार हजार योगासन खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेत जागतिक पातळीवरील योगासनांचे महत्त्व अधोरेखीत केले. या स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी 52 परीक्षकांनी काम केले. त्यांचा परिचय टेक्निकल डायरेक्टर उमंग द्वान यांनी करुन दिला. एकता बुडैरलिक यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी योगासन क्रीडेची नयन मनोहर प्रात्यक्षिके सादर केली गेली.