एकाच समाजाचे राज्य निर्माण करणारी वक्तव्ये दुर्दैवी : आ. थोरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशातील चातुवर्ण व्यवस्थेविरुद्ध सर्वप्रथम गौतम बुद्धांनी लढा दिला असून समतेचा तोच विचार पुढे नेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला. उपेक्षितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे व प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेच्या माध्यमातून समानतेचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवतेचे मानबिंदू असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री, काँग्रेस विधिमंडळाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व राष्ट्रीय दलित पँथरच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, उत्कर्षा रूपवते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी. आर. कदम, कुसुम माघाडे, सुधाकर रोहम, हिरालाल पगडाल, विश्वास मुर्तडक, किशोर टोकसे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, अजय फटांगरे, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, सीताराम राऊत, गौतम गायकवाड, प्रा. शशिकांत माघाडे, अॅड. अमित सोनवणे, दलित पँथरचे राजू खरात, प्रवीण गायकवाड, रवींद्र गिरी, प्रकाश वाघमारे, संदीप दळवी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना थोरात म्हणाले की, भारत हा विविध भाषा, वेशभूषा असलेला देश आहे. या सर्वांना एकत्रित ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. घटनेतील तत्वं जपण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची असताना काहीजण मात्र संविधानाची शपथ घेऊन राज्यघटनेच्या तत्त्वां विरुद्ध विचार मांडत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या देशात जातीभेद निर्माण करुन राजकारण करण्याची पद्धत रुजवली जात आहे. देशात एकाच समाजाचे राज्य निर्माण करण्याची जाहीर वक्तव्ये केली जात आहेत, ही गोष्ट लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. आपली लढाई देशाच्या हितासाठी आहे. त्यासाठी आपण सर्वांनी समतेचे तत्त्वज्ञान असलेल्या विचारांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिशा देण्याचे काम केले असून त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग गोरगरीब, दलित व शोषितांच्या उद्धारासाठी केला. लोकशाहीमुळेच देशातील सर्व घटकांच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या असून इतिहास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र अशा विविध विषयांचे गाढे अभ्यासक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचा मूलमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याचे सांगत प्रत्येकाने त्यांच्या विचारांचा जागर करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी उत्कर्षा रुपवते, श्रीकांत माघाडे, सुधाकर रोहम, बी. आर. कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. विनय घोसाळे यांनी प्रास्ताविक, गौतम गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर प्रा. शशिकांत माघाडे यांनी आभार मानले.