संगमनेरचे निवृत्त प्रांताधिकारी आरमुगम अनंतात विलीन!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक न्याय विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एन.आरमुगम (वय 72) यांचे बुधवारी नागपूरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोविडची लागण झाली होती. त्यांच्यावर नगापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान बुधवारी त्यांचे निधन झाले. अंबाझरी येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 1985 ते 87 या काळात त्यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी म्हणूनही काम केले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
संगमनेरचे एकोणावीसावे उपविभागीय अधिकारी म्हणून एन.आरमुगम यांची 9 सप्टेंबर 1985 रोजी नियुक्ति झाली होती. 10 जुलै 1987 अशा त्यांच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी कार्यालयीन शिस्तीचा नवा पायंडा घातला. यानंतरच्या काळात नागपूरचे अतिरीक्त जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि आदिवासी विकास आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. निवृत्तीच्यावेळी ते राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव होते.
निवृत्तीनंतर ते नागपूरातील सिव्हील लाईन परिसरात स्थायिक झाले. मागील आठव÷यात त्यांना कोविडची लागण झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच बुधवारी (ता.26) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर नागपूरातील अंबाझरी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. संगमनेरच्या प्रशासकीय सुधारणेत एन.आरमुगम यांचा मोठा वाटा आहे. भारतीय प्रशासन सेवेतील या अधिकार्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक अधिकारी आज प्रशासनातील महत्त्वाच्या जबाबदार्या सांभाळीत आहेत. अनेक वरीष्ठ अधिकारीही कामकाजासंदर्भात त्यांचा सल्ला घेत असत. त्यांच्या निधनाने एक उत्तम प्रशासक हरपला आहे अशा शब्दात संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.