लोकांमध्ये रोष असून, निवडणुकीची वाट पाहताहेत ः पाटील अंमली पदार्थ कारवाईवरुन मंत्री नबाब मलिकांवर जोरदार टीका

नायक वृत्तसेवा, राहाता
ज्या पद्धतीने अंमली पदार्थ या विषयाचे समर्थन चाललेय व त्या पार्टीत सहभागी झालेल्यांची वकिली सुरू झालीय, त्याबाबत राज्यात घराघरांत चर्चा सुरू आहे. लोक आता रोष व्यक्त करण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत आहेत. देगलूरच्या पोटनिवडणुकीच्या निकालात हा अंसतोष पाहायला मिळेल, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नबाब मलिक यांच्यावर टीकेची झोड उठवली.

बुधवारी (ता.27) त्यांनी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या समावेत राहाता येथे आयोजित केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेअंतर्गत आयोजित शिबिराची पाहणी केली. संयोजक खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करणार्या समितीने या योजनेला क्लिन चिट दिली, याबद्दल बोलताना ते म्हणाले, सत्य हे सत्यच असते, ते झाकण्याएवढी बेबंदशाही अद्याप माजलेली नाही. या योजनेमुळे शेतकर्यांना दोन पिके घेता येतील एवढे पाणी उपलब्ध झाले, हे सत्य आहे.

मंत्री नवाब मलिक केंद्रीय तपास अधिकारी समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करीत आहेत, याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या मंडळींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना मान्य नाही. त्यांना फायद्याची आहे तेवढीच राज्यघटना हवी आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वयोश्री योजना ज्येष्ठांपर्यंत पोहचविण्याचे पुण्याचे काम खासदार डॉ. सुजय विखे पाटील करीत असल्याने त्यांना चांगला जावई मिळेल, अशा आशीर्वाद आमदार चंद्रकांत पाटील यांनी या योजनेच्या शिबिराला भेटी प्रसंगी दिला. त्यामुळे उपस्थित पदाधिकार्यांत एकच हशा पिकला. यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, अशोक पवार, गटनेते विजय बोरकर, नगरसेवक सलीम शहा, दशरथ तुपे आदी उपस्थित होते.
