दिलासादायक! आज जिल्ह्यात 56 दिवसानंतरची सर्वाधीक ‘निचांकी’ रुग्णसंख्या!! संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येलाही लागला ब्रेक; शहरातील अवघ्या वीस जणांचा समावेश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी कायम असल्याने जवळपास दोन महिने कोविडच्या दहशतीत वावरणार्या जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज तर गेल्या 56 दिवसांतील सर्वाधीक निचांकी रुग्णसंख्या समोर आली आहे. यापूर्वी 1 एप्रिलरोजी जिल्ह्यात सर्वाधीक कमी 1 हजार 319 रुग्ण आढळले होते, त्यानंतर भराला आलेल्या कोविडने जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मात्र आता संक्रमणाची गती मोठ्या प्रमाणात खालावली असून आज जिल्ह्यात अवघे 1 हजार 610 रुग्ण समोर आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णगती कमी होत असली तरीही संगमनेर तालुक्यातील संक्रमण कायम होते. मात्र आज संगमनेरकरांनाही मोठा दिलासा मिळाला असून शहरातील अवघ्या 21 जणांसह तालुक्यातील 127 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 21 हजार 351 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील 841 जणांवर उपचार सुरु असून आज 285 जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी वेगही आता 95.59 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मे महिन्यातील पहिल्या तीन आठवठ्यात एप्रिलच्या सरासरालाही मागे टाकणार्या जिल्ह्याच्या रुग्णसंख्येला गेल्या 22 मे पासून ओहोटी लागली. मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात समोर येणार्या रुग्णसंख्येत निम्म्याहून अधिक घट होत दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांच्या खाली आल्याने मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना काहीसा विसावा मिळाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. मात्र त्याचवेळी देशात कोविडचे तिसरे संक्रमण अधिक वेगाने पसरणार असल्याचा अंदाज असल्याने यंत्रणांनी पुढील अंदाज गृहीत धरुन आजच्या स्थितीतल्या आरोग्य यंत्रणांची क्षमता दुपटीहून अधिक वाढवण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. संगमनेर तालुक्यात आजच्या स्थितीत 1 हजार 500 रुग्णांवर एकाचवेळी उपचारांची व्यवस्था आहे, मात्र शासनाने संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता गृहात धरुन त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबाबत अधिक जलदपणे पाय उचलण्यास सुरुवात केल्याने संगमनेरच्या प्रशासनाने सध्याची क्षमता दुपटीहून पुढे नेत 3 हजार 500 रुग्णांवर एकाचवेळी उपचार करता येतील अशी व्यवस्था उभी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 16, खासगी प्रयोगशाळेचे 61 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा प्राप्त झालेल्या 50 निष्कर्षांमधून संगमनेर तालुक्यातील 127 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात अन्य तालुक्यातील तिघांसह संगमनेर शहरातील अवघ्या 21 रुग्णांचा समावेश आहे तर 103 रुग्ण ग्रामीणभागातून समोर आले आहे. आजच्या अहवालात शहरातील साईनगर परिसरातील 54 वर्षीय महिला, विद्यानगर मधील 40 वर्षीय तरुण, इंदिरा नगरमधील 29 वर्षीय तरुण, जून्या पोस्टाजवळील 67 वर्षीय महिलेसह 43 वर्षीय इसम, संजय गांधी नगरमधील 21 वर्षीय तरुणी, दिल्ली नाका परिसरातील 26 वर्षीय महिला, भारत नगरमधील 52 व 51 वर्षीय महिलांसह 38 वर्षीय तरुण, परदेशपूर्यातील 73 वर्षीय महिला, पंचायत समिती परिसरातील 47 वर्षीय इसम, रहेमतनगर मधील 13 वर्षीय मुलगी, नायकवाडपूर्यातील 67 वर्षीय महिला, बी.एड्.कॉलेज परिसरातील 32 वर्षीय महिला, 45 वर्षीय पोलीस कर्मचारी व संगमनेर असा पत्ता असलेल्या 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 व 30 वर्षीय तरुण, 23 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालक आणि अन्य तालुक्यातील जेऊर येथील 13 वर्षीय मुलगा, देवळाली प्रवरा येथील 42 वर्षीय तरुण व लोणी येथील 55 वर्षीय इसमाचा समावेश आहे.
आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजार 351 झाली आहे. गेल्या वर्षभरापासून आत्तापर्यंत तालुक्यातील 98 हजार 191 जणांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यातून सरासरी 21.74 टक्के दराने 21 हजार 351 रुग्ण समोर आले. आत्तापर्यंत तालुक्यातील 20 हजार 409 रुग्णांवर उपचार पूर्ण करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून तालुक्यातील
रुग्ण बरे होण्याचा सरासरी वेग आता 95.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुर्दैवाने या कालावधीत शासकीय नोंदीनुसार शहरातील 23 जणांसह तालुक्यातील एकूण 101 जणांचा बळीही गेला आहे. सध्या तालुक्यातील 841 रुग्णांवर विविध कोविड आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार सुरु आहेत. आज 285 जणांनी उपचार पूर्ण केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
आज जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या गेल्या 56 दिवसांतील सर्वाधीक निचांकी पातळीवर आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज जिल्ह्यात सर्वाधीक 187 रुग्ण नेवासा तालुक्यात आढळले. त्या खालोखाल संगमनेर 127, राहुरी 126, कोपरगाव व शेवगाव प्रत्येकी 123, अकोले 122, अहमदनगर महापालिका क्षेत्र 112, श्रीरामपूर 95, पारनेर व नगर ग्रामीण प्रत्येकी 90, राहाता व पाथर्डी प्रत्येकी 86, जामखेड 82, श्रीगोंदा 73, कर्जत 71, इतर जिल्ह्यातील 14 आणि भिंगार लष्करी परिसरातील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत आज 1 हजार 610 रुग्णांची भर पडल्याने जिल्हा आता 2 लाख 57 हजार 787 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.