भाद्रपदाने केला संगमनेर तालुक्याचा घात! महिन्याभरात साडेनऊशे रुग्णांसह सात जणांचा बळी गेला


नायक वृत्तसेवा, संगमनेर
2 एप्रिलपासून अवघ्या चार रुग्णांसह सुरु झालेल्या कोविडच्या प्रादुर्भावाने पाच महिन्यात भयानक स्वरुप धारण केले आहे. विशेष म्हणजे सरलेल्या ऑगस्टमधील सण-उत्सवांनी तालुक्याच्या रुग्णसंख्येला धोकादायक वळणावर नेवून ठेवले असून एकट्या ऑगस्टमध्ये संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल नऊशे एकसष्ट रुग्णांची भर पडली आहे. या कालावधीत शहरातील दोघांसह तालुक्यातील सात जणांचा बळीही गेला आहे. दररोज सरासरी 31 रुग्णांची भर घालणार्‍या ऑगस्टने तालुक्याच्या रुग्णसंख्येचे पहिले सहस्रक ओलांडीत तब्बल 1 हजार 720 रुग्णसंख्या गाठली होती.


पाच महिन्यांपूर्वी नायकवाडपुरा आणि आश्वी बु. येथील इसमांच्या रुपाने संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रवेश झाला. त्यानंतर सुरुवातीच्या काळात अत्यंत धिम्यागतीने वाढणार्‍या प्रादुर्भावामुळे अगदी जूनच्या शेवटच्या तारखेपर्यंत कोविडची तालुक्यातील स्थिती पूर्णतः नियंत्रणात होती. मात्र याच दरम्यान अनलॉक 2.0 च्या रुपाने सर्वकाही खुले झाल्याने कोविडचा प्रादुर्भाव वाढला आणि तालुक्याच्या रुग्णसंख्येने जुलैच्या शेवटच्या तारखेला एकुण 758 रुग्णसंख्येसह 19 मृत्युची नोंद केली. संगमनेर तालुक्यात जुलै महिन्यात सरासरी चांगला पाऊस होत असल्याने या दरम्यान रुग्णसंख्या वाढणार असल्याचा प्रशासनाचा पूर्व अंदाज होता, तो जुलैने तंतोतंत खरा ठरवला. जुलैप्रमाणे ऑगस्टमध्येही सरासरीनुसार रुग्णसंख्या वाढेल असाही अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र उत्सवांचा महिना असलेल्या ऑगस्टने मात्र तो फोल ठरवला.


प्रशासनाच्या अपेक्षेप्रमाणे ऑगस्टच्या सुरुवातीच्या पहिल्या दहा दिवसांत तसे घडलेही. या कालावधीत मुस्लिम बांधवांचा बेकरी ईद व हिंदू बांधवांचा रक्षाबंधनाचा सण साजरा होवूनही तालुक्याच्या रुग्णसंख्येत अवघ्या 265 रुग्णांची भर पडली, तर 4 ऑगस्ट रोजी निमोण येथील 75 वर्षीय वयोवृद्ध, 6 ऑगस्ट रोजी मालदाड रोडवरील 81 वर्षीय वयोवृद्ध आणि 8 ऑगस्ट रोजी कर्‍हे येथील 55 वर्षीय इसमाचा बळी गेला.


या क्षणापर्यंत सगळेकाही अपेक्षेप्रमाणे सुरु असताना 11 पासून दररोज सापडणार्‍या रुग्णसंख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसू लागले. या कालावधीत कृष्ण जन्माष्टमी व पोळ्याचा सणही उत्साहाने साजरा झाला. त्यातून थोडीफार सरासरी वाढत दहा दिवसांच्या कालावधीत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 286 रुग्णांची भर पडली, तर 17 ऑगस्ट रोजी कुंभार आळा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 20 ऑगस्ट रोजी संगमनेर खुर्दमधील 44 वर्षीय तरुणासह चिंचोली गुरव येथील 94 वर्षीय वयोवृद्धाचा बळीही गेला. सुरुवातीच्या 20 दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 551 रुग्णांची म्हणजे सरासरी दररोज 27.55 रुग्णांची भर पडत रुग्णसंख्या तेरावे शतक ओलांडून पुढे सरकली.


प्रशासनाला भिती होती गणेशोत्सवातील दहा दिवसांची, त्यानुसार घडलेही. 21 ऑगस्ट रोजी तालुक्याच्या रुग्णसंख्येत तेरा जणांची भर पडली व सोनुशी येथील 51 वर्षीय महिलेच्या रुपाने ऑगस्टमधील सातवा बळीही नोंदविला गेला. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडतच राहीली. गणेशोत्सवासाठी घरगुती सजावटीचे सामान, गणेशमूर्ती घेण्यासाठी नागरिक नियम पायदळी तुडवित मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने कोविडचे फावले. याच कालावधीत कोविडचा विषाणूंनी शहरासह तालुक्यातील अनेक नवीन भाग व्यापले.


ऑगस्टमधील शेवटच्या अकरा दिवसांत सोनुशीतील महिलेचा मृत्यू वगळता अन्य अप्रिय वार्ता टाळली, मात्र या अकरा दिवसांत रुग्णवाढीची सरासरी वाढवित कोविडने शहरासह तालुक्यातील तब्बल 410 नव्या रुग्णांना स्पर्श केला. त्यामुळे या एकाच महिन्यात तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 961 रुग्णांची भर पडून तालुका अनियंत्रित अवस्थेत जावून 1 हजार 720 रुग्णसंख्येवर पोहोचला. महिन्याभरात वाढलेल्या या रुग्णसंख्येत शहराने थोडी पिछाडी घेतली तर ग्रामीभागात सर्वदूर कोविडचा प्रादुर्भाव झाला. या महिन्यातील एकूण वाढलेल्या रुग्णसंख्येत तालुक्यातील 603 तर शहरातील 358 रुग्णांचा समावेश होता. वरील रुग्णसंख्या समोर आणण्यासाठी प्रशासनाने शासकीय प्रयोगशाळेद्वारा 105 जणांची, खासगी प्रयोगशाळेद्वारा 279 जणांची तर रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 577 जणांची स्त्राव चाचणी केली. एकंदरीत जुलैच्या शेवटच्या दिवसापर्यंत सरासरी प्रति महिना 190 रुग्णवाढ होत असताना श्रावण आणि भाद्रपदाला सामावणार्‍या ऑगस्टने त्यात लक्षणीय वाढ करीत एकाच महिन्यात तब्बल 961 रुग्णांची भर घालीत रुग्णवाढीचा विक्रम केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *