श्रीरामपूर शहरात पालिकेच्या ‘घंटागाड्या’ अचानक गायब कचरा उचला; अन्यथा पालिकेत कचरा टाकण्याचा शहरवासियांचा इशारा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
नगरपालिकेच्या आरोग्य खात्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शहरातील कचरा गोळा करणार्‍या गाड्या अचानकपणे चार-चार दिवस गायब होत आहे. यामुळे शहरात कचरा साचत आहे. या पार्श्वभूमीवर घरामध्ये लोकांनी चार दिवस कचरा सांभाळायचा कसा? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

नगरपालिकेचा कचर्‍याचा ठेका हा नेहमी वादाचा विषय आहे. ज्या ठेकेदाराला कचर्‍याचा ठेका दिला जातो. तो काही दिवसातच त्याला वैतागतो. शहराच्या अनेक भागात गेल्या आठवडाभरापासून कचरा गाड्या दिसलेल्या नाहीत. पूर्वी दिवसाआड येणार्‍या गाड्या आता चार चार दिवस येत नाहीत. त्यामुळे घरामध्ये चार दिवस कचरा सांभाळून ठेवणे शक्य नसल्याने लोकांनी आता रस्त्याच्या कडेला कचरा फेकण्यास सुरुवात केली आहे. त्यातून आरोग्याचे नवीन प्रश्न निर्माण होत आहेत.

यामध्ये सर्वात मोठा भाग असलेल्या प्रभाग दोन, अहिल्यादेवी नगर, फातेमा कॉलनी, मिल्लतनगर, रामनगर, संजय नगर, लक्ष्मीनारायण नगर अशा सर्वच भागांत चार दिवसांपासून कचरा गाडीचे दर्शन झालेले नाही. पालिकेकडे नेमक्या किती गाड्या आहेत याची माहिती जनतेसाठी जाहीर करावी व प्रत्येक भागामध्ये कचरा उचलण्यासाठी कशाप्रकारे यंत्रणा कार्यरत आहे याची माहिती मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांच्या माहितीसाठी वर्तमानपत्रातून जाहीर करावी. किमान एक दिवसाआड कचरा गाड्या प्रत्येक भागात गेल्या पाहिजे. आणि तो कचरा उचलला गेला पाहिजे कचरा उचलणारे कामगार सुद्धा नीट काम करीत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी याबाबत लक्ष घालून आरोग्य खात्याचा कारभार सुधारावा आणि शहरवासियांची कचरा समस्यापासून मुक्तता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील सर्व भागांतील कचरा उचलला गेला नाही तर नगरपालिकेत मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सदरचा कचरा आणून टाकू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Visits: 125 Today: 1 Total: 1426218

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *