कोविडने घेतला संगमनेर तालुक्यातील आणखी एकाचा बळी! खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या चंदनापुरीतील तरुणाचा झाला मृत्यु
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोविडचा संसर्ग दररोज उग्ररुप घेत असून गेल्या चार दिवसांतच तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल पावणे दोनशे रुग्णांची भर पडण्यासोबतच दोघांचा बळीही गेला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चंदनापुरी येथील 39 वर्षीय तरुणाचा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. सदर मृत्यु स्थानिक यंत्रणेने अद्यापही कोविड मृतांच्या यादीत नोंदविला नाही, मात्र सदर तरुण कोविड संक्रमित असल्याचा अहवाल गेल्या गुरुवारीच (ता.3) प्राप्त झाला होता. त्यामुळे सदरचा मृत्यु संगमनेर तालुक्यातील कोविडचा 29 वा बळी ठरणार आहे.
संगमनेर तालुक्यातील कोविड स्थिती जुलैपर्यंत पूर्णतः नियंत्रणात होती. मात्र सरल्या महिन्यात बकरी ईद, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव आणि मोहरमसारखे सण आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आणि तालुक्याची कोविडस्थिती एकप्रकारे हाताबाहेर गेली. या एकाच महिन्यात तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 961 रुग्णांची भर पडून तालुक्याने पहिले सहस्त्रक ओलांडून 1 हजार 720 रुग्णसंख्या गाठली. गेल्या महिन्यात निमोणमधील 75 वर्षीय इसम, मालदाड रोडवरील 81 वर्षीय वयोवृद्ध, कर्हे येथील 55 वर्षीय इसम, कुंभारआळा परिसरातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचोली गुरव येथील 94 वर्षीय वयोवृद्ध, संगमनेर खुर्दमधील 44 वर्षीय तरुण व सोनुशीतील 51 वर्षीय महिलांचा बळी घेतला.
तर या महिन्याच्या पहिल्याच दिवशी समनापुरातील 65 वर्षीय इसम आणि गुरुवारी (ता.3) मालदाडमधील 35 वर्षीरू तरुण छायाचित्रकाराचा बळी घेत कोविडने आपली दाहकता कायम ठेवली. हा सिलसिला अद्यापही कायम असून एका दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा तालुक्यातील चंदनापुरीत राहणार्या 39 वर्षीय तरुणाचा जीव गेला आहे. गेल्या 3 सप्टेंबररोजी सदरच्या तरुणाची स्त्राव चाचणी खासगी प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयातच उपचार सुरु होते, त्याच दरम्यान शुक्रवारी (ता.4) त्याचा अंत झाला. सदरचा मृत्यु अद्याप शासकीय यादीत गृहीत धरण्यात आलेला नाही. मात्र सदर तरुणाची स्त्राव चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तो तालुक्यातील कोविडचा 29 वा बळी ठरला आहे हे मात्र निश्चित.
रुग्णांचा बळी जाण्यासोबतच तालुक्याच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचे प्रमाणही वाढले असून गेल्या चारच दिवसांत तालुक्यातील रुग्णसंख्येत तब्बल 175 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यातील 80 रुग्ण एकट्या शुक्रवारी आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यातच खळबळ उडाली होती. काल बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील माळीवाडा परिसरात राहणार्या 45 व 18 वर्षीय महिलांसह 21 वर्षीय व 18 वर्षीय तरुण, जनतानगर परिसरातील 41 वर्षीय तरुण, वाडेकर गल्ली परिसरातील 27 वर्षीय तरुण, गणेशनगर भागातील 75 व 60 वर्षीय महिला, साई श्रद्धा चौकातील 60 वर्षीय पुरूषासह 44 व 42 वर्षीय तरुण, बाजारपेठ परिसरातील 31 वर्षीय तरुण, शिवाजीनगर मधील 36 वर्षीय तरुण, मालदाड रोड परिसरातील 32 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुणांसह नऊ वर्षीय बालिका, तसेच 58 वर्षीय महिला, 36 वर्षीय तरुण.
तर, तालुक्यातील घुलेवाडी येथील 50 व 47 वर्षीय इसम व 43 वर्षीय महिला, तसेच दहा वर्षीय बालिका, कौठे धांदरफळ येथील 50 वर्षीय महिला व 50 वर्षीय इसम, रायते येथील 68, 45, 38, 35, 21 व सतरा वर्षीय महिलांसह 40 वर्षीय तरुण व सहा वर्षीय बालिका, चिखली येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कनोली येथील 42 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 57 वर्षीय इसमासह 24 वर्षीय महिला, वाघापूर येथील 59 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी व 10 वर्षीय बालक, चंदनापुरी येथील 39 व 25 वर्षीय तरुण, समनापुर येथील 39 वर्षीय तरुण, मंगळापुर येथील 38 वर्षीय महिलेसह 16 व 14 वर्षीय मुले, आंबी दुमाला येथील 50 वर्षीय इसम.
निमोण मधील 90 वर्षीय वयोवृद्धासह तीस वर्षीय महिला, ढोलेवाडी येथील 38 वर्षीय तरुण, चिकणी मधील 58 वर्षीय इसमासह 26 वर्षीय महिला, बोरबन मधील नऊ वर्षीय बालक, कुरकुटवाडीतील 55, 48 व 43 वर्षीय महिला तसेच 45, 28 व 26 वर्षीय तरुण, माळवाडीतील 74, 48 व पंचवीस वर्षीय महिलांसह 52, 48, 28, 18 वर्षीय पुरुष, एक वर्षीय बालक तसेच तीन वर्षीय बालिका, कोठे बुद्रुक येथील 80 वर्षीय वयोवृद्ध महिलेसह 35 व 17 वर्षीय महिला व 40 वर्षीय तरुण, माळेगाव पठारावरील 60 व 21 वर्षीय महिला, मनोली येथील एकूण 70 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला तसेच 35 वर्षीय तरूण व 13 वर्षीय बालक, तसेच कोल्हेवाडीतील 41 वर्षीय व 37 वर्षीय तरुणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. शुक्रवारी तालुक्याच्या रुग्णसंख्येत एकाचवेळी तब्बल 80 रुग्णांची विक्रमी वाढ झाल्याने तालुक्याची रुग्णसंख्या एकोणाविसाव्या शतकाच्या दारात 1 हजार 895 वर पोहोचली आहे.
संगमनेर तालुक्यातील आजची रुग्णसंख्या 1 हजार 895 असून त्यातील केवळ 191 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. आत्तापर्यंत 1 हजार 677 रुग्णांनी उपचार पूर्ण केले असून तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.50 टक्के झाले आहे. तालुक्यात कोविडने 29 बळी घेतले असून मृत्युदर 1.42 टक्के आहे. आत्तापर्यंत प्रशासनाने 7 हजार 605 जणांची स्त्राव चाचणी केली आहे. त्यात 3 हजार 305 रॅपिड अँटीजेन प्रणालीद्वारा, 3 हजार 202 शासकीय प्रयोगशाळेतून तर 1 हजार 95 खासगी प्रयोगशाळेतून करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील संक्रमित रुग्ण समोर येण्याचे प्रमाण 24.91 टक्के आहे.