श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतीपदाचा निकाल राखीव निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविले

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद निवडणूक प्रक्रिया गुरुवारी (ता.18) न्यायालयाच्या निर्देशानुसार व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुकीचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. सदरचा निकाल बुधवारपर्यंत (ता.24) जाहीर करणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी अनिल पवार यांनी दिली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याने त्याबाबतचे अपील उच्च न्यायालयात करणार असल्याची माहिती माजी सभापती दीपक पटारे यांनी दिली.

पंचायत समितीचे सभापतीपद विखे गट व काँग्रेसकडून प्रतिष्ठेचे करण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीला विषेश महत्व प्राप्त झाले होते. दोन्ही गटाकडून निवडणूक प्रक्रियेनंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला. पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे यांना अपात्र ठरविण्यात आले. यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. हे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे काँग्रेसच्या डॉ. वंदना मुरकुटे या पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. शिंदे यांच्या अपात्रतेसाठी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी 9 नोव्हेंबरला या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याला विखे गटाचे माजी सभापती दीपक पटारे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.

पंचायत समितीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याचे आपल्या याचिकेत नमूद केले आहे. याप्रकरणी खंडपीठाने 18 नोव्हेंबरला होणारी निवडणूक प्रक्रिया घेण्यास मान्यता देत निकाल जाहीर करण्यास मात्र मनाई केली. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार, सहाय्यक तथा गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी काँग्रेसच्यावतीने डॉ. वंदना मुरकुटे यांनी दोन व विखे गटाच्यावतीने कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कल्याणी कानडे यांच्यावतीने अॅड. आर. डी. जोंधळे तर वैशाली मोरे यांच्यावतीने अॅड. एस. बी. काकड यांच्या मार्फत पंचायत समितीत 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय 27 टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिल्याने सदरचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिला.

सदरचे दोन्ही उमेदवारी अर्ज अन्य प्रवर्गातील उमेदवार असून हे इतर मागास महिला प्रवर्गाचे नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले तर डॉ. वंदना मुरकुटे या इतर मागास प्रवर्गातून निवडून आल्या असून त्यांनी जातीच्या दाखल्यासह सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितले. आरक्षित पदाकरिता एकच सदस्य पात्र असल्याने मतदानाची गरज पडली नाही. न्यायालयाने निवडणूक कार्यक्रम घेण्यास मनाई केलेली नसल्याने आजची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती पवार यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना विखे गटाचे माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, संदीप शेलार, वैशाली मोरे, कल्याणी कानडे, सभापती संगीता शिंदे रामभाऊ तरस आदी उपस्थित होते. तर काँग्रेसच्यावतीने इंद्रनाथ थोरात, अशोक कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक कानडे, पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, विजय शिंदे, विजय मोरे, अॅड. समीन बागवान आदी उपस्थित होते.
