कोविडच्या भयातही अकोले पोलीस ठाण्यात ‘लाचखोरी’ जोमात! कारवाई टाळण्यासाठी पाच हजारांची लाच घेणारा पोलीस कर्मचारी एसीबीच्या ताब्यात..

नायक वृत्तसेवा, अकोले
सध्या संगमनेर व अकोले तालुक्यात कोविड संक्रमणाचा वेग अधिक असल्याने नागरिक भयभीत झालेले असताना अकोले पोलीस ठाण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक वृत्त हाती आले आहे. दाखल असलेल्या ‘अदखल पात्र’ गुन्ह्यात अटक होवू नये यासाठी चक्क पाच हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलीस नाईक संदीप पांडे (वय 33) याला अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. गेल्या काही महिन्यात अकोले पोलीस ठाण्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकोले पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक संदीप पांडे हा लाचखोरीसाठी चांगलाच प्रसिद्ध असल्याची माहिती मिळत आहे. प्रकरण कोणतेही असो, पांडेकडे असले की गांभीर्य नसलेल्या प्रकरणालाही मोठे गंभीर स्वरुप प्राप्त होत असे. संगमनेर तालुक्यातील तक्रारदार, साडू व त्याच्या दोन मुलांवर अदखल पात्र गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संबंधिताला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्याच्या चौकशीत संशयित कायद्याबाबत अज्ञानी असल्याची बाब पांडेने हेरली आणि त्याच्यातील लालच जागी झाली. या दरम्यान त्याने संशयिताला अटक करण्याची भीती दाखवली. तसेच चॅप्टर केस करुन तत्काळ जामीन देण्यासाठी आणि एकाचे गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी तब्बल पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.

कारवाई टाळण्यासाठी इतकी मोठी रक्कम ऐकून घाबरलेल्या तक्रारदाराने अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून आपबीती कथन केली. संबंधिताने त्या पोलीस कर्मचार्याला आज रोजी ठरलेली रक्कम देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा लावला. यावेळी ठरलेली रक्कम स्वीकारताना पो.ना.पांडे याला नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक विजय जाधव, अहमदनगरचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर एसीबीचे पथक त्याला घेवून शासकीय विश्रामगृहावर गेले. तेथे त्याची कसून चौकशी सुरु आहे. या कारवाईने मात्र अकोले पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले असून लाचखोर पोलीस कर्मचार्‍यांमुळे वारंवार पोलीस ठाण्याची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 196 Today: 1 Total: 1424226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *