संगमनेर तालुक्यात प्रशासनातील तिघा भूमिपुत्रांची नियुक्ती नायब तहसीलदार विनोद गिरी, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व वन अधिकारी सोनाली गिरी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यात प्रशासकीयदृष्ट्या सक्षम असलेल्या संगमनेर तालुक्यात नुकत्याच तिघा भूमिपुत्रांची नियुक्ती झाली आहे. यामध्ये नायब तहसीलदार विनोद गिरी, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आणि वन परिक्षेत्र अधिकारी सोनाली गिरी यांचा समावेश आहे. आपल्याच तालुक्यात काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत.
जोर्वे येथील विनोद गिरी यांची नायब तहसीलदार पदी, चंदनापुरी येथील प्रवीण गोसावी यांची तालुका कृषी अधिकारी तर जोर्वे येथील सोनाली गिरी यांची सामाजिक वनीकरण विभागात वन परिक्षेत्र अधिकारीपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. या तीनही भूमिपुत्रांच्या नियुक्त्या येथे झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. यापूर्वी विनोद गिरी अकोले येथे नायब तहसीलदारपदी होते. तसेच प्रवीण गोसावी देखील अकोले येथे तालुका कृषी अधिकारी पदावर कार्यरत होते. तर सोनाली गिरी नंदूरबार येथे वन परिक्षेत्र अधिकारीपदी कार्यरत होत्या. या सर्व अधिकार्यांनी आपल्या कामातून वेगळा ठसा उमटविला आहे.
भौगोलिक आणि प्रशासकीयदृष्ट्या संगमनेर तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्यात वेगळे स्थान आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही कायमच चर्चेत राहणार्या तालुक्याची धुरा भूमिपुत्रांना मिळाल्याने त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. यामुळे इतर ठिकाणी काम केल्याचा अनुभव जरा वेगळा असला तरी येथे त्यांना आपले कसब सिद्ध करावे लागणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या नियुक्त्यांबद्दल सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सत्कारही होत आहे.