धोत्रेत जमिनीच्या वादातून एकाचा खून

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
‘जमीन दुसर्‍याला का विकली? मला का सांगितलं नाही.’ या कारणावरुन तालुक्यातील धोत्रे येथील अण्णासाहेब मारुती चंदने (वय 40) यांना नऊ जणांनी मारहाण करून त्यांचा खून केला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (ता.17) अण्णासाहेब चंदने हे आपल्या घरासमोर असताना गैरकायद्याने मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड, काठ्या घेऊन घरासमोर येऊन बाबासाहेब राधाकिसन चंदने हा अण्णासाहेब चंदने यांस म्हणाला की, ‘तुझी जमीन दुसर्‍याला का विकली. ती मला का नाही दिली. मी घेतली असती,’ असे म्हणून त्याच्यासह भूषण बाबासाहेब चंदने, सोमनाथ बाबासाहेब चंदने, प्रताप गणेश काटे यांनी काठीने पाठीवर, पोटावर, हातावर, पायावर मानेवर व आकाश विकास चंदने, सुनीता गणपत चंदने, गौरव गणपत चंदने, भाऊसाहेब निवृत्ती काटे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. तर विलास कडू चंदने याने डोक्यात लोखंडी रॉडचा वार करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने अण्णासाहेब चंदने यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताची पत्नी वनिता अण्णासाहेब चंदने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नऊ जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 163/2021 भादंवि कलम 302, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visits: 135 Today: 2 Total: 2059309

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *