भामट्याने महिलेला फसविले; सोन्याचे दागिने घेऊन केला पोबारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील मालदाड रस्ता येथील समर्थ नगरमधील एका महिलेला सोन्याचे दागिने स्वच्छ करुन देतो असल्याचा बनाव रचून भामट्याने फसविल्याची घटना मंगळवारी (ता.16) दुपारी साडेबारा वाजता घडली आहे. यामध्ये अज्ञात भामट्याने मिनी गंठण व साखळी घेऊन पोबारा केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अज्ञात भामट्याने सुरुवातीला सोन्याचे दागिने स्वच्छ करुन देणार असल्याचा बनाव रचत इतर भांडी स्वच्छ करुन दिली. यावरुन महिलेचा विश्वास संपादन केला आणि साडेचार हजार रुपयांचे मिनी गंठण व एक तोळा वजनाची तीस हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी घेऊन पोबारा केला. या प्रकरणी सुनीता भिकाजी नेहे (वय 60) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गु.र.नं. 92/2021 भादंवि कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदारफटांगरे हे करत आहे.
