कळसूबाईचे मंदिर सजले वारली चित्रकलेने कळसूबाई मित्रमंडळाने मंदिराचे केले सुशोभीकरण

नायक वृत्तसेवा, अकोले
अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेले कळसूबाई मातेचे मंदिर अकोले तालुक्यातील बारी-जहागीरदारवाडी या गावांच्या सीमेवर वसलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसूबाईचे शिखर नवरात्रीनिमित्त वारली चित्रकलेने सजले आहे.

नवरात्र उत्सवात भाविकांनी हे मंदिर फुलून जाते. यंदा नवरात्रीपूर्वी बारी व जहागीरदारवाडी येथील कळसूबाई तरुण मित्रमंडळाने पुढाकार घेत मंदिराचे सुशोभीकरण केले आहे. आदिवासी अस्मितेचे प्रतीक मानली जाणारी वारली कला मंदिरावर रंगकाम करून साकारण्यात आली आहे. वारली कला चित्ररूपाने मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटण्यात आली आहे. वारली चित्रकार रमेश साबळे यांनी हे रंगकाम केले आहे.

गावातील तरुण मित्रांनी एकत्र येत मंदिराचे सुशोभीकरण व स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. गावातून वर्गणी गोळा करत या तरुण मित्रांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थानी वसलेल्या कळसूबाईचे मंदिर हिरामण खाडे, पंढरीनाथ खाडे, विकास खाडे, अंकुश करटुले, भरत घारे, गुलाब करटुले, साहेबराव भारमल, रवींद्र खाडे, मच्छिंद्र खाडे, राजू खाडे, दोन्ही गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व तरुण मित्रांच्या सहकार्याने स्वच्छ व सुंदर केले. याकामी ए. एस. के. फाउंडेशन मुंबई व बायफ या संस्थेचे मार्गदर्शन लाभले आहे. नवीन रूपातील मंदिर सर्व भाविकांना आकर्षित करत आहे. नवरात्रीनिमित्त नऊ दिवस या मंदिराला महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक भेट देत असतात. याचबरोबर नवरात्रीत इथला निसर्ग हिरवाईने नटलेला असतो. अतिशय मोहक वातावरण व मधेच दाटून येणारे धुके असा निसर्गाचा वेगळा आविष्कार येथे अनुभवायला मिळतो.
