बाभळेश्वरमधील उड्डाणपुलाचे ग्रहण कधी सुटणार? बाभळेश्वर चौकात नित्याचीच होतेय वाहतूक कोंडी
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील बाभळेश्वर गावाला वाहतुकीच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. बाभळेश्वर गावातून नगर-मनमाड तसेच नाशिक-संभाजीनगर हा मराठवाड्याला जोडणारा सर्वात महत्त्वाचा महामार्ग जातो. नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर जगविख्यात साई मंदिर तसेच शनि मंदिर असल्यामुळे या देवस्थानाला जाण्यासाठी साईभक्त व शनिभक्त बाभळेश्वर गावातूनच जातात. तसेच लोणी परिसरातील शैक्षणिक संकुल आणि विविध साखर कारखान्यांची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या सर्व कारणामुळे बाभळेश्वर चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.
या सर्व गोष्टींना पर्याय म्हणून महाराष्ट्र शासनाने याठिकाणी 15 वर्षांपूर्वी नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाला मंजुरी दिली होती. त्यानुसार बाभळेश्वर चौकात उड्डाणपुलाला सुरुवातही झाली होती. त्यानुसार याठिकाणी उड्डाणपुलाचे चार कॉलम गेल्या पंधरा वर्षातच फक्त उभे केले आहे. या उभ्या केलेल्या कॉलममुळे वाहतुकीची कोंडी सुटण्याऐवजी बाभळेश्वरमध्ये वाहतूक कोंडी वाढतच गेली आणि ही बाब बाभळेश्वरकरांच्यादृष्टीने डोकेदुखी ठरत गेली. ती आजतागायत तशीच आहे.
या उड्डाणपुलाच्या कॉलममुळे बसस्थानकातून निघणार्या बस, नगर-मनमाड तसेच नाशिक-औरंगाबाद या मार्गावरून जाणार्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. बर्यावेळा विरुद्ध दिशेच्या गाड्या न दिसल्यामुळे लहान-मोठे अपघात मोठ्या प्रमाणावर याठिकाणी झालेले आहे. उड्डाणपुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहनांची पार्किंग होते. उड्डाणपुलाला बांधलेल्या कॉलमचा उपयोग फक्त मोठमोठे फ्लेक्स व जाहिराती लावण्यासाठी सध्या होत आहे. याचा सुद्धा वाहतुकीच्या कोंडीवर मोठा परिणाम होतो. परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष आहे.
एकंदरीत आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी सार्वजनिक बांधकाम खात्याची अवस्था आहे. लवकरच नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाभळेश्वरच्या उड्डाणपुलाचा प्रश्न याच वेळेस निकाली काढावा, अशी बाभळेश्वरकरांची मागणी आहे. नेमका उड्डाणपूल होणार की नाही हीच संभ्रमावस्था सध्या आहे. बाभळेवरच्या उड्डाणपुलाला लागलेले ग्रहण शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सुटेल की नाही याचीच वाट आता बाभळेश्वरचे नागरिक पाहत आहे.