सावधान! विनाकारण फिरणार्यांची ‘एंटीजेन’ सुरु! ‘भटक्यांना’ शहराच्या विविध भागातून आणले जात आहे तपासणीसाठी; अवघ्या अर्ध्यातासातच चौघे पॉझिटिव्ह..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नाहक फिरणार्यांची रॅपीड एंटीजेन चाचणी करुन पॉझिटिव्ह असणार्यांना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्याचे आदेश रविवारी जिल्हाधिकार्यांनी बजावले होते. जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु झाली आहे. संगमनेरातही आज सकाळपासून पोलिसांकडून विनाकारण भटकणार्यांना ताब्यात घेत बसस्थानकावरील कोविड तपासणी केंद्रावर आणले जात आहे. सध्या या सर्वांच्या चाचण्या सुरु असून आत्तापर्यंत चौघांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोविड संक्रमणात एकसारखी वाढ होत आहे. मागील जवळपास एक महिन्याहून अधिक काळापासून जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू आहेत. वैद्यकीय सेवा वगळता जिल्ह्यातील अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. असे असतांनाही जिल्ह्यातील रुग्णगती कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्याबाबतचे निरीक्षण नोंदवितांना संचारबंदीतही विनाकारण फिरणारे, मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करणारे आणि हातात पिशव्या घेवून किराणा, भाजी वा डॉक्टरांच्या जून्या औषधांच्या चिठ्ठ्या घेवून भटकणार्यांमुळे संसर्ग नियंत्रणात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लोकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी अधिक सक्तिचे आदेश देतांना विनाकारण फिरणार्यांची रॅपीड एंटीजेन चाचणी करुन पॉझिटिव्ह असणार्यांना थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करतांना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर व वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांच्या उपस्थितीत आज सकाळी बसस्थानकाच्या परिसरात कोविड चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी नवीन नगररोडसह शहरातील विविध ठिकाणी चेक पॉईंट सुरु करण्यात आले असून रस्त्यावर दिसणार्या प्रत्येकाची सखोल चौकशी करुन समाधानकारक उत्तर न देणार्याला या केंद्रावर आणले जात आहे व त्यांची तपासणी केली जात आहे.
याशिवाय वारंवार सूचना करुनही अनेकजण मॉर्निंग अथवा इव्हिनिंग वॉकच्या नावाखाली कोविडचा प्रादुर्भाव वाढवित असल्याने पोलिसांनी गस्ती पथकांची संख्या वाढवली असून आजपासून प्रवरा नदीच्या परिसरासह शहराच्या आसपासच्या फिरणाच्या ठिकाणांवर पोलिसांची बारकाईने नजर राहणार आहे. गस्ती पथकाला कोणीही फिरतांना आढळल्यास त्यांना ताबडतोब ताब्यात घेवून कोविड चाचणीसाठी केंद्रावर आणले जाणार आहे व त्यांची कोविड चाचणी करुनच त्यांची मुक्तता होणार आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन केले म्हणून दंडात्मक कारवाई देखील होणार आहे. त्यामुळे संगमनेरकरांनो, सावधान! विनाकारण घराबाहेर पडतांना पुन्हा घरात यायचे की कोविड सेंटरमध्ये जायचे याचा एकदा विचार करा.
आज सकाळी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी स्वतः आपली रॅपीड एंटीजेन चाचणी करुन या मोहीमेचा शुभारंभ केला. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच सत्रात पोलिसांनी बसस्थानकाच्या परिसरासह शहरातील विविध भागातून जवळपास चाळीस जणांना चाचणीसाठी बसस्थानकात आणले, सुरुवात काही चाचण्यांमध्येच त्यातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात रवाना करण्यात आले आहे.