शीरखुर्म्याचा गोडवा उतरण्यापूर्वीच ‘तीनबत्ती’ प्रकरणी पोलिसांचे ‘कोम्बिंग’! रात्रभर छापासत्र राबवून नऊ जणांना उचलले; निवेदन देणार्‍यांच्या परिवार सदस्यांचाही समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील आठवड्यात संगमनेर शहरातील मोगलपूरा परिसरात घडलेल्या घटनेनंतर तिघा पोलीस जवानांना तीनबत्ती चौकात जमावाने धक्काबुक्की व मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. तत्पूर्वी कोविड नियमांचे उल्लंघन करुन मोठ्या संख्येने गोळा झालेल्या गर्दीने शासकीय व खासगी वाहनांवर दगडफेक करण्यासह बॅरीकेट्सही फेकून दिले होते. घटनेच्या दुसर्‍याच दिवशी पोलिसांनी जमावातील चौघांना अटक केल्यानंतर रमजान ईदमुळे ‘धरपकड’ थांबविण्यात आली होती. शुक्रवारी तालुक्यात धुमधडाक्यात ईद साजरी झाली आणि सर्वत्र शीरखुर्म्याचा घमघमाट सुरु झाला, मात्र त्याचा गोडवा उतरण्यापूर्वीच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी शनिवारी रात्रभर ‘कोम्बिंग’ राबवून नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे निष्पन्न होवून अटक झालेल्या आरोपींची संख्या आता तेरा झाली आहे. गेल्या शनिवारी अटक झालेल्या चौघांना यापूर्वीच जामीन मंजूर झालेला आहे.


गेल्या गुरुवारी (ता.6) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहराच्या पूर्वेकडील कत्तलखान्यांचा परिसर म्हणून कुपरिचित असलेल्या मोगलपूरा परिसरात मोठा जमाव गोळा झाला होता. यावेळी गस्तीपथकातील अहमदनगरच्या पोलीस जवानांचे वाहन तेथे आले असता त्यांनी कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन पाहून गर्दी हटविण्यासह मास्कशिवाय वावरणार्‍यांना काठीचा ‘प्रसाद’ देण्यास सुरुवात केली. त्यातून ‘आम्हाला नियम व कायदे लागू नाहीत’ अशा अविर्भावात वावरणार्‍यांचा संताप झाला आणि त्यांनी काही असामाजिक तत्त्व गोळा करुन पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. जमावात मोठ्या संख्येने नागरिक असल्याने व पोलिसांची संख्या मर्यादीत असल्याने पोलिसांनी तेथून माघार घेत तीनबत्ती चौकाकडे जाण्यास सुरुवात केली. यादरम्यान जमावातील काहींनी पो.कॉ.सलमान शेख, पो.कॉ.प्रशांत केदार व भागीरथ देशमाने या पोलीस जवानांना धक्काबुक्की व मारहाण केली. तीनबत्ती चौकात तर जमावाने अधिक उग्र होत एका जवानाला घोळक्यात घेण्याचाही प्रयत्न केला, मात्र वेळीच त्याने आपली सुटका करुन घेतल्याने पुढील अनर्थ टळला.


यानंतर तीनबत्ती चौकाकडून पुन्हा मोगलपूर्‍याकडे परतणार्‍या जमावाने जाताजाता पोलिसांनी तपासणीसाठी महामार्गावर लावलेले अडथळे (बॅरिकेट्स) व तीनबत्ती चौकातील निवार्‍यासाठी उभारलेला तंबू उचकटून फेकून दिला. या घटनेनंतर केवळ पोलीस दलातच नव्हेतर संपूर्ण संगमनेर तालुक्यात संताप उसळला. आपले घरदार सोडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र परिश्रम घेणार्‍या पोलिसांवरील हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले. शहरातील डझनावर संघटनांनी पोलिसांना निवेदन देत अशा असामाजिक तत्त्वांची कोणतीही गय न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसांवर अंतर्गत आणि बाह्य असा दुहेरी दबाव निर्माण झाला. या घटनेच्या मध्यरात्रीनंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या तीनबत्ती ते कमल पेट्रोल पंपापर्यंतच्या मार्गावरील सर्व सीसीटिव्हींचे डिव्हीआर ताब्यात घेत आरोपींची ओळख पटविण्यास सुरुवात केली.


त्यातून निष्पन्न झालेल्या आरोपींच्या शोधासाठी शुक्रवारी (ता.7) रात्री पोलिसांनी छापासत्र सुरु केले, मात्र जमावाच्या हिमतीवर बळ मिळालेल्यांना घरी परतल्यावर आपल्या कृत्याचे परिणाम दिसू लागल्याने अनेकजण पसार झाले. त्यामुळे रात्रभर शोधाशोध करुनही पोलिसांच्या हाती केवळ मुसेब अलाउद्दिन शेख (वय 31, रा.अपनानगर), आसिफ मेहबूब पठाण (वय 31, रा.मोगलपूरा), सय्यद युनूस मन्सूर (वय 24, रा.गवंडीपूरा) व मोसीन इमाम शेख (वय 35, रा.जम्मनपूरा) हे चारच आरोपी लागले. त्याच्या दुसर्‍या दिवशी मुस्लिम समाजातील काही पदाधिकार्‍यांनी पोलीस उपअधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांची भेट घेत निर्दोष असलेल्या तरुणांवर कारवाई न करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे त्यापूर्वीच पोलिसांनी या हल्ल्यात सहभाग असलेल्या शिष्टमंडळातील निम्म्याहून अधिक जणांच्या कुटुंब सदस्यांची ओळख पटविलेली होती. त्यांचे निवेदन मुस्लिम समाजातील तरुणांसाठी होते की आपल्याच घरातील सदस्यांसाठी अशीही चर्चा सुरु झाली.


या दरम्यान पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना तातडीच्या रजेवर जावे लागल्याने शहरात उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या. अनेकांनी राजकीय दबावातून पोलीस निरीक्षक रजेवर गेल्याच्या पुड्याही उधळल्या, मात्र वस्तुस्थिती त्यापेक्षा उलट होती. त्यातच रमजान ईद तोंडावरच असल्याने पोलिसांनी तेथेही आपल्यातील मानवतेचे दर्शन घडवतांना स्वतःहून धरपकड थांबविले, मात्र त्याचवेळी रमजान ईद होताच निष्पन्न झालेल्या आरोपींची गय होणार नाही हे देखील स्पष्ट झाले. त्याचा प्रत्यय शनिवारी संगमनेरकरांना आला. रमजान ईद होताच पोलिसांनी आखलेल्या पूर्वनियोजनानुसार अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी एकाचवेळी परिसराची नाकाबंदी करुन जलदगतीने आरोपी उचलण्याची योजना आखली. शनिवारच्या ‘कोम्बिंग’ बाबत मोठी गोपनीयता पाळण्यात आली होती.


त्यानुसार शनिवारी (ता.15) मध्यरात्री पोलिसांनी एकाएका विभागाला वेढा घालून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातून पोलिसांनी निष्पन्न केलेल्या 35 संशयीत आरोपींपैकी नऊ जणांना झोपेतून थेट पोलीस वाहनात उचलून नेण्यात आले. यावेळी काही जणांनी गोळा होवून पोलिसांना विरोध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर दहशत करण्याची संधी कधीतरी मिळत असते, आणि ती गेल्या गुरुवारी मिळालेली होती आता फक्त त्याचे परिणामच बाकी असल्याने अशा प्रकारांचा पोलीस कारवाईवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पोलिसांनी रात्रीच गोळा झालेल्यांना दाखवून दिले. त्यामुळे गेल्या आठवड्यातील प्रसंग मनात घेवून पोलीस पथकापर्यंत पोहोचलेल्यांना आडवाटेने घरचा रस्ता धरावा लागला.


शनिवारी (ता.15) मध्यरात्रीपासून आज (ता.16) पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांनी मोगलपूरा, लखमीपूरा, सय्यदबाबा चौक, नायकवाडपूरा, जोर्वेनाका, भारतनगर अशा सर्वभागाला वेढा घालीत घराघरातील माणसांची ओळख पटविली. त्यातून रिझवान मोहंमदखान चौधरी (वय 31, रा.अपनानगर), इर्शाद अब्दुल जमीर (वय 37), अरबाज अजीम बेपारी (वय 20, दोघेही रा.भारतनगर), सय्यद जोयेबअली शौकत सय्यद (वय 27, रा.तीनबत्ती), अर्शद जावेद कुरेशी (वय 18), शफीक इजाज शेख (वय 24, दोघेही रा.लखमीपूरा), मोहंमद मुस्ताक फारुक कुरेशी (वय 35) व फारुक बुर्‍हाण शेख (वय 45 दोघेही रा.मोगलपूरा) अशा नऊ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘तीनबत्ती’ हल्ला प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 13 झाली आहे. यापूर्वी अटक केलेल्या चौघांना एका दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर जामीन मंजूर झाला असून गेल्या सोमवारीच त्यांची सुटका झाली आहे. रमजान ईद होताच पोलिसांनी ‘तीनबत्ती’ हल्ला प्रकरण पुन्हा टेबलवर घेतल्याने या हल्ल्यात सहभागी असलेल्यांचा थरकाप सुरु झाला असून अनेकजण शीरखुर्म्याच्या वाट्या अर्धवट तशाच ठेवून पसार झाले आहेत.

मागील गुरुवारी (ता.6) घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर मुस्लिम समाजातील काही पदाधिकार्‍यांनी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची भेट घेवून या घटनेचा निषेध नोंदवित दोषी असलेल्यांवर कारवाई करावी, मात्र एकाही निर्दोष व्यक्तिला अटक करु नये अशा आशयाचे निवेदन दिले. त्याच दिवशी दैनिक नायकने या पदाधिकार्‍यांमधील काही जणांचे नातेवाईकच या हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचे जळजळीत वृत्त प्रसिद्ध केले होते. शनिवारच्या (ता.15) ‘कोम्बिंग’ ऑपरेशनमधून त्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 117409

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *