संगमनेरातील प्रतिष्ठितांची सोशल खाती होताहेत ‘हॅक’! डॉ.जयश्री थोरात यांच्यानंतर आता डॉ.संजय मालपाणींच्या बनावट फेसबुक अकौंटद्वारा पैशांची मागणी..

गोरक्षनाथ मदने, संगमनेर
सोशल माध्यमातून जगाचे अंतर डोळ्यासमोर आणले हे खरे असले तरीही त्याला दुसरी बाजूही आहेच. आजवर राज्यातील, देशातील अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठितांची सोशल माध्यमं ‘हॅक’ करुन त्याद्वारे आपल्या पद्धतीचे संदेश देण्याच्या प्रकारांसह आर्थिक फसवणुकीसारख्या गोष्टी घडल्या आहेत. मात्र ग्रामीण शहरामध्ये अभावानेच असे प्रकार समोर आले आहेत. आता मात्र सोशल माध्यमांचा वापर करुन दुसर्‍याच्या नावाने गंडवण्याचे लोण संगमनेरातही येवू पाहत आहे. दोनच दिवसांपूर्वी एकविरा फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ.जयश्री थोरात-जैन यांच्या नंतर आता प्रसिद्ध उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ.संजय मालपाणी यांच्या नावाने कोणा अज्ञाताने फेसबुकवर बनावट खाते उघडले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या माध्यमातून फे्रंड रिक्वेस्ट पाठवून चक्क संबंधितांकडून पैशांची मागणी केली जात आहे. या घटनेबाबत या दोन्ही प्रतिष्ठितांकडून शहर पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

दोनच दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कनिष्ठ कन्या डॉ.जयश्री थोरात-जैन यांच्या सोशल माध्यमावरील फेसबुकचे अकौंट कोण अज्ञाताने क्लोन (हुबेहुब दुसरे) केले. त्या माध्यमातून त्याने थोरात यांच्या फ्रेंड लिस्टमधील काहींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यासोबतच पैशांची मागणीही केली आहे. ‘आपल्याला तत्काळ अमूक-अमूक रकमेची आवश्यकता आहे, उद्या सकाळी आपण ती परत करु, फोन पे असल्यास त्वरीत ऑनलाईन टाकावेत’ अशा प्रकारचा संदेश पाठवून संबंधित इसम समोरच्याचा प्रतिसाद मिळताच एक नंबरही देत आहे.


डॉ.जयश्री थोरात-जैन या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. त्यांनी एकविरा फौंडेशनच्या माध्यमातून विविध समाजाभिमुख उपक्रमातून संगमनेर तालुक्यात नाव मिळविलं आहे. मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात कर्करोग तज्ज्ञ म्हणूनही त्या रुग्णसेवा करतात. त्यातच त्या थोरातांसारख्या राज्यातील दिग्गज राजकीय परिवारातील असल्याने त्यांच्या नावाला विशिष्ट वलय आहे.

डॉॅ.संजय मालपाणी राज्यात लौकीक असलेल्या मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आहेत. त्यासोबतच राज्यात शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. गीता परिवार या राष्ट्रीय पातळीवरील बालसंस्काराच्या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेचे ते गेल्या तीन दशकांपासून राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन या केंद्र सरकारच्या खेल मंत्रालयाशी संलग्न असणार्‍या संस्थेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. संगमनेरातील या दोन्ही नावांना मोठे वलय असल्याने सोशल माध्यमांचा वापर करुन लुबाडणार्‍या एखाद्या टोळीकडून कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी या दोन्ही व्यक्तिंच्या कार्यालयांमधून शहर पोलीस ठाण्यात सविस्तर माहिती देण्यात आली असून सदरचे बनावट खाते बंद करण्याची विनंती करण्यात आली आहे.


आपल्या परिचयातील व्यक्तीअथवा मित्र यांच्याकडे आपला संपर्क क्रमांक असतोच. अडचणीत असलेली व्यक्ती पैशांची मागणी करताना ओळखीतल्या माणसांना फोन करीत असते. त्यामुळे अशा प्रकारे बनावट अकौंट सुरू करुन प्रतिष्ठीत व्यक्तिंच्या नावाने कोणी पैशांची मागणी करीत असल्यास त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. आम्हाला दोन्ही प्रतिष्ठीत व्यक्तिंच्या कार्यालयाकडून याबाबतची माहिती मिळाली आहे. संबंधित खाती बंद करण्यास सांगण्यात आले असून यामागे कोण आहे याचाही आम्ही शोध घेत आहोत.
– मुकुंद देशमुख
पोलीस निरीक्षक : संगमनेर शहर

Visits: 3 Today: 1 Total: 23152

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *