‘नाशिक-पुणे’ हायस्पीड रेल्वे मार्गाच्या जमीन मोजणीस सुरूवात संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथून सुरूवात
नायक वृत्तसेवा, घारगाव
देशातील पहिल्या सेमी हायस्पीड ‘नाशिक-पुणे’ रेल्वे मार्गाच्या जमीन मोजणीला सोमवारपासून (ता.24) संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथून सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी महारेल, महसूल, भूमि अभिलेख, वन व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला नाशिक-पुणे हा 235 किलोमीटरचा रेल्वे मार्ग पुणे, नगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधून जात आहे. सुमारे तासी 180 किलोमीटर रेल्वेचा वेग असणार आहे. विशेष म्हणजे मार्गावर अठरा बोगदे असणार आहे. त्यामध्ये संगमनेर तालुक्यातील केळेवाडी, माळवाडी, बोटा ,ऐलखोपवाडी , खंदरमाळवाडी, नांदूर खंदमाळ, जांबुत, साकूर, जांभुळवाडी, पिंपळगाव देपा, कोळवाडे, पिंपरणे, जाखुरी, खराडी, जोर्वे, कोल्हेवाडी, समनापूर, पोखरी आदी गावांचा समावेश असणार आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी महारेल, महसूल, भूमि अभिलेख, वन व कृषी विभागाचे अधिकारी खंदरमाळवाडी परिसरात जमिनीची मोजणी करत होते. ज्या शेतकर्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या ते शेतकरीही उपस्थित होते.
याबाबत महारेलचे आधिकारी सोमनाथ गुंजाळ अधिक माहिती देताना म्हणाले, एकशे सहा गावांतून हा रेल्वे मार्ग जात आहे. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यांत भू संपदानाची कार्यवाही सुरू झाली आहे. खंदरमाळवाडी येथे संयुक्त मोजणी सुरू आहे ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर शेतकर्यांचे किती क्षेत्र जाणार आहे ते निश्चित करणार आहोत. त्यानंतर संबंधित शेतकर्यांच्या जमिनीचे पाठीमागील तीस वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. हा रेल्वे मार्ग डोंगराळ, सपाट अशा वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतून जाणार आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार साडेसोळा हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा महारेलचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.