शिर्डीतील कोविड सेंटरच्या गलथान कारभाराबाबत संताप

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शिर्डी येथील साई संस्थानच्या कोविड सेंटरच्या गलथान कारभारामुळे अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक संतापले आहेत. याबाबत संस्थान प्रशासकीय व्यवस्थापक समिती, मुख्यमंत्री व महसूल मंत्र्याना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी दिली आहे.

साईबाबा संस्थानच्या माध्यमातून कोविड सेंटर चालविले जाते. हजारो रुग्णांनी तेथे उपचार घेतले आहे तर असंख्य रुग्ण घेत आहेत. परंतु, तेथील सुरू असलेला विस्कळीतपणा, उपचार, वशिलेबाजी, बेजबाबदारपणा, अधिकारी वर्गाची मनमानी, परिचारिकेचं चिघळलेलं आंदोलन, त्या आंदोलनाला असलेली राजकीय फूस, यातून कोविड सेंटरमधील निरपराध रुग्णांचा जात असलेला बळी ही मोठी चिंतेची बाब आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. हे सर्व साईबाबांच्या शिकवणीनुसार निराशाजनक आहे. याबाबत भक्त परिवार, परिसरातील नागरिक, उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, रुग्णांना मदत करणार्या सचिन चौघुले सारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर सूडबुध्दीने खोटे गुन्हे दाखल केले हे निषेधार्ह आहे. असे खोटे गुन्हे दाखल झाले तर कोणी कुणाला मदत करेल का? असा सवाल मापारी यांनी विचारला आहे.
