खासदार सदाशिव लोखंडे काही कार्यकर्त्यांकडून टार्गेट! प्रस्थापित राजकारण्यांची फूस असल्याचा शिवसैनिकांचा आरोप

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
नेवासा पाठोपाठ श्रीरामपूर येथे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांना काही कार्यकर्त्यांकडून टार्गेट करण्यात आले. मतदारसंघातील काही प्रस्थापित राजकीय मंडळींची या प्रकारांना फूस आहे, असा आरोप शिवसैनिक जाहीरपणे करत आहेत. मात्र, राज्यात सत्ताधारी पक्ष असल्यामुळे शिवसैनिकांना या घटनांविरोधात आपल्या स्टाईलने उत्तर देणे शक्य नाही, अशी भावनाही पदाधिकारी बोलून दाखवत आहेत.


खासदार लोखंडे यांच्या उंबरगाव येथील बंगल्यात घुसून काही तरुणांनी अंगरक्षक व सुरक्षारक्षकाला दमबाजी केली. त्यापूर्वी नेवासा येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी खासदार लोखंडे यांच्या अंगावर भरबैठकीत शाई फेकली होती. मतदारसंघात काही ठिकाणी आढावा बैठकीदरम्यान लोखंडे यांना काही लोकांच्या वाईट वर्तणुकीचा सामना करावा लागला आहे. खासदार लोखंडे हे शांत व संयमी स्वभावाचे आहेत. ते शिवसेनेचे असले तरीही राडा संस्कृतीचा भाग नाहीत. राजकीय गटातल्या वितुष्टात ते पडत नाहीत. हेवेदाव्याच्या राजकारणात त्यांनी रस दाखवलेला नाही. मात्र, लोकसभेच्या मागील कार्यकाळापासूनच लोकसंपर्काच्या अभावामुळे या टीकेला त्यांना सामोरे जावे लागत आहे. खासदार लोखंडे हे मतदारसंघात दिसत नाहीत, हे आरोप सातत्याने लोखंडे यांच्यावर होत आहेत.

आपण खासदार असल्याने दिल्लीत अधिवेशनाला उपस्थित रहावे लागते. एखाद्या सरपंचाप्रमाणे आपण चोवीस तास लोकांना उपलब्ध राहू शकत नाही. मात्र, लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यावर नेहमी भर असतो, अशी प्रतिक्रिया आपल्यावर होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देताना लोखंडे यांनी शिर्डी येथे पत्रकारांना दिली होती. नेवासा व श्रीरामपूर येथे झालेल्या दोन्ही घटनांना याच आरोपांची किनार आहे. मात्र, दोन्हीही घटना या विरोधाच्या लोकशाहीतील संकेतांना धरून नाहीत. श्रीरामपूर येथील घटनेत आरोपींनी सुरक्षारक्षकाला बंगल्यात घुसून खासदारांसमोर धक्काबुक्की करण्याचा प्रकार बेकायदा व आंदोलनांच्या परंपरेला धरून नाही, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी स्वतःच आपल्या नैसर्गिक, राजकीय शैलीच्या विरोधात जाऊन या घटनेच्या पोलीस चौकशीची मागणी करत आहेत. तसेच नेवासा व श्रीरामपूर येथील घटनांमागील बोलविता धनी कुणी दुसराच आहे, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

खासदार सदाशिव लोखंडे हे नगरपालिकांकरिता 70 ते 80 लाख रुपये खर्च करून योगा सेंटर उभारत आहेत. प्रस्थापितांचा विरोध झुगारून निळवंडेच्या कालव्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे. शिर्डी संस्थानमध्ये भव्य-दिव्य कोविड रुग्णालयाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी त्यांनी मिळवली आहे. असे असताना अल्पसंख्याक समाजाच्या व संस्थानिक नसलेल्या नेत्यावर अशा प्रकारचे हल्ले निंदनीय आहेत.
– राजेंद्र झावरे (जिल्हाध्यक्ष, उत्तर नगर शिवसेना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *