संगमनेर बाजार समितीचा विविध मागण्यांबाबत शासनाकडे पत्रव्यवहार कोविड केअर सेंटर सुरू करण्यासह कामगार व व्यापार्यांचे लसीकरण करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 12 मे पासून 21 मे पर्यंत बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद ठेवले आहेत. परंतु, दिवसेंदिवस कोविडची परिस्थिती गंभीर होत असल्याने शासनाने बाजार समितीच्या आवारात कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी द्यावी, माथाडी कामगार व बाजार समितीचे कर्मचार्यांचे लसीकरण करावे आणि कोविड सेंटर सुरू करण्यासाठी 25 लाखांच्या भांडवली खर्चास मान्यता द्यावी अशा विविध मागण्या पत्रान्वये संबंधित विभागांकडे करण्यात आल्या असल्याची माहिती संगमनेर बाजार समितीचे सचिव सतीष गुंजाळ यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. सर्वत्र रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात, कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. यामध्ये बाजार समितीमधील माथाडी कामगार व बाजार समितीचे कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यामुळे माथाडी कामगार व बाजार समितीमधील कर्मचारी धास्तावले आहेत. शासनाने मुदतीत निर्णय घेऊन त्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. तसेच मृत्यू झालेल्या कामगारांना आर्थिक मदत न मिळाल्यास बाजार समितीचे कामकाज बंद ठेवून बेमुदत आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी व कामगारांच्या नुकसानीची घटना घडू नये, म्हणून तात्काळ निर्णय घेऊन सहकार्य करावे असे पत्र सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक यांना पाठविण्यात आले आहे.

येथील बाजार समितीच्या नवीन शेतकरी निवास इमारतीत पाच खोल्या, दोन छोटे व एक सभागृह असून तेथे 80 ते 100 खाटांची व्यवस्था होऊ शकेल. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने लवकरात लवकर कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशा आशयाचे पत्रही तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच 25 लाखांच्या भांडवली खर्चास मान्यता मिळावी याबाबतही जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठविले आहे. याचबरोबर हमाल, मापाडी, खरेदीदार, व्यापारी, कर्मचारी यांचे लसीकरण करावे, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न समित्या अत्यावश्यक सेवेत येत असल्याने माथाडी कामगार, बाजार समिती कर्मचारी व व्यापारी यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे गरजेचे आहे. याबाबत शासनाच्या संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी.
– सतीष गुंजाळ (सचिव, बाजार समिती संगमनेर)
