‘अगस्ति’चे कार्यकारी संचालक घुलेंचा राजीनामा मंजूर प्रभारी कार्यकारी संचालकपदी शेळके यांची नियुक्ती

नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा अखेर गुरुवारी (ता.13) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच घुले यांना कार्यकारी संचालक पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

सध्या पूर्वहंगामी कामे प्रगतीपथावर असल्याने या पदावर नवीन कार्यकारी संचालक नियुक्त होईपर्यंत अगस्ति कारखान्याचे मुख्य लेखापाल एकनाथ शेळके यांची प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी गुरुवारपासून कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी अलीकडेच आपल्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संचालक मंडळाने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. तत्पूर्वी घुले हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून रुजू झाले आहेत. यापूर्वी ही 15 वर्षे त्यांनी तेथे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिलेले होते. याच बैठकीत शेळके यांचेकडे प्रभारी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. ते अगस्ति कारखान्याच्या स्थापनेपासून लेखापाल विभागात कार्यरत होते. सुरुवातीला लिपीक म्हणून त्यानंतर बोर्ड सचिव व मुख्य लेखापाल म्हणून ते काम पाहत होते. अगस्ति पतसंस्थेचे कार्यकारी संचालक म्हणूनही काही दिवस त्यांनी काम पाहिले. यावेळी माजी मंत्री, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक वैभव पिचड यांचेसह संचालक मंडळ उपस्थित होते.

Visits: 103 Today: 2 Total: 1101388

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *