… अखेर राजूरमध्ये पकडलेल्या स्वस्त धान्य प्रकरणी चौघांवर गुन्हा धान्य व ट्रकसह 56 लाखांचा ऐवज जप्त; चौघेही पोलिसांच्या ताब्यात
नायक वृत्तसेवा, अकोले
राजूर पोलिसांनी संशयास्पदरित्या स्वस्त धान्य वाहतूक करणारी चार वाहने ताब्यात घेतली होती. दरम्यान तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याशी पत्रव्यवहार करुनही तब्बल चोवीस तासांनंतरही त्यांचे कोणतेही उत्तर न आल्याने राजूर पोलिसांनी शासकीय योजनेतील जीवनावश्यक गहू व तांदूळ बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आले म्हणून अखेर चौघांविरोधात अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून सुमारे 56 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान संगमनेर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी गुरुवारी (ता.13) राजूर येथे भेट दिली व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.
अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यासमोरच बुधवारी दुपारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहाय्यक फौजदार नितीन खैरनार, मुख्य हवालदार देविदास भडकवार यांनी गाड्यांची तपासणी करत असतानाच रेशनिंगचे धान्य भरलेले चार ट्रक तपासणी करून ताब्यात घेतले होते. दरम्यान, माजी आमदार वैभव पिचड यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला व थेट जिल्हाधिकार्यांकडे कारवाईची मागणी केली. अखेर महसूल यंंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस शिपाई विजय फटांगरे यांनी राजूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वाहने (एमएच.04, ईवाय.5291), (एमएच.15, 9057), (एमएच.17, एजी.3883), व (एमएच.17, टी.2900) त्यात गहू व तांदळाच्या गोण्या असा एकूण 56 लाख 13 हजार 50 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी हौशीराम दिनकर देशमुख (रा.केळुंगण, ता.अकोले), साई संदेश धुमाळ (रा.धुमाळवाडी, ता.अकोले), योगेश राजेंद्र धुमाळ (रा.अकोले) व अशोक हिरामण देशमुख (रा.केळुंगण, ता.अकोले) यांच्यावर वर नमूद शासकीय योजनेतील जीवनावश्यक गहू व तांदळाच्या गोण्या बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आले म्हणून अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 चे कलम 3 (1), 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करत आहे.