निम्नशासकीय सेवानिवृत्तांना वेळेत वेतन द्या! खासदार शरद पवारांकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासकीय सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वेतन दरमहा पाच तारखेच्या आत बँकेत खात्यावर वर्ग होत होते. परंतु, निम्नशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकार्यांचे सेवानिवृत्ती वेतन गेल्या काही महिन्यांपासून सतत उशिराने होत आहे. सध्या कोरोना संकट असून अनेक कर्मचार्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर निम्नशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना किमान सात तारखेच्या आत सेवानिवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रमोद कुलट आदिंनी खासदार शरद पवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे शासकीय कर्मचार्यांना वेळेत सेवानिवृत्ती वेतन दिले जाते तर दुसरीकडे निम्नशासकीय कर्मचार्यांकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. फेब्रुवारी 2021 पासून महिन्याच्या अखेरीस हे वेतन मिळत आहे तर जून महिन्याचे निवृत्तीवेतन जुलै महिना संपला तरी अद्यापही बँकेत वर्ग झालेले नाही. अनेकांची उपजीविका केवळ या सेवानिवृत्ती वेतनावर अवलंबून आहे. हे वेतन वेळेत मिळत नसल्याचे त्यांची फरपट होत आहे. त्यामुळे खासदार शरद पवार यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी लिपीक, ग्रामसेवक, शिक्षक, माध्यमिक शिक्षक, आरोग्य, बांधकाम, जलसंपदा, लघु पाटबंधारे, महिला व बालकल्याण विभाग आदी विभागांतील अधिकारी व कर्मचार्यांसह निम्नशासकीय सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.
